पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची भरदिवसा शेतात गळा चिरून हत्या ; पारनेर तालुका हादरला

पारनेर : पारनेर तालुका हत्याकांडाने पुन्हा एकदा हादरला आहे. नारायणगव्हाण परिसर पुन्हा चर्चेत आला आहे.नारायणगव्हाण सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश कांडेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले व सध्या पॅरोलवर सुटका झालेले नारायणगव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

सध्या कोरोना संसर्ग वाढल्याने अनेक कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यात शेळके यांचीही सुटका केली होते.शेळके हे त्यांच्या शेतात काम करत होते. दुपारी एकच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी शेळके एकटेच होते. धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्याने त्यांच्या मानेला गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.शेळके यांची हत्या कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र हा बदला घेण्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.

नारायण गव्हाणचे (ता. पारनेर) तत्कालीन उपसरपंच प्रकाश भाऊसाहेब कांडेकर यांचा १३ नोव्हेंबर २०१० रोजी पुणे-नगर महामार्गावर गोळ्या झाडून खून झाला होता. या प्रकरणात पाच जणांना जन्मठेप, तर खुनासाठी शस्त्र पुरविणाऱ्या एका आरोपीला तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. कांडेकर यांच्या मृतदेहातून गोळी गायब केल्याचा आरोप असलेल्या सरकारी डॉक्टरांची पुराव्या आभावी सुटका झाली होती. मार्च २०१७ मध्ये कोर्टाने हा निकाल दिला.

शिक्षा झालेल्यांमध्ये माजी सरपंच राजाराम जयवंत शेळके व त्याचा मुलगा राहुल शेळके यांचाही समावेश होता. ते सध्या तुरुंगात शिक्षा भोगत होते. करोना संसर्ग वाढल्याने त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. या काळात गावातील शेतात त्यांनी काम सुरू केले होते. त्यानुसार शेळके आज शेतात एकटेच काम करीत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यामुळे हा बदला घेतल्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

…म्हणून झाला कांडेकरांचा खून

माजी सरपंच राजाराम शेळके व प्रकाश कांडेकर यांच्यात राजकीय वैमनस्य होते. त्यातून एका खूनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातून प्रकाश कांडेकर याचा भाऊ, भाचा व इतर कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केलेली होती. निर्दोष सुटका झाल्यानंतर कांडेकरच्या समर्थंकांनी गावात फटाके फोडून गुलालाची उधळण केली होती. सेवा सोसायटी, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रकाश कांडेकर यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले होते. कांडेकर याचे वाढते राजकीय वर्चस्व शेळके यांना खटकत होते. त्यामुळे लष्करात सेवेत असलेल्या एकाकडून थेट उत्तर प्रदेशमधून पिस्तूल आणून ती पुण्यातील नायर टोळीला पुरवून ही हत्या घडवून आणली होती. २०१० मध्ये ही घटना घडली होती. २०१७ मध्ये याप्रकरणी निकाल लागला व आरोपींना शिक्षा झाली. आता २०२१ मध्ये पुन्हा गावात रक्तपात झाला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.