सासरच्या छळाला कंटाळून दीड वर्षाच्या मुलीसह विवाहितेची आत्महत्या ;माहेरच्या नातेवाइकांनी विवाहितेचा अंत्यसंस्कार पतीच्या घरासमोरच केला

जुन्नर : मुलगा होत नाही, तसेच दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना हिवरे तर्फे नारायणगाव येथे शुक्रवारी (दि. ११) घडली.  ही आत्महत्या नसून खून करून तिला विहिरीत टाकलं असल्याची तक्रार विवाहितेच्या आई-वडिलांनी केली आहे.याप्रकरणी पती, दीर आणि सासू, सासरे यांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाइकांनी विवाहितेचा अंत्यसंस्कार पतीच्या घरासमोरच केला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रंजना अविनाश तांबे (वय ३०) या विवाहितेने मुलगी श्रीशा अविनाश तांबे (वय दीड वर्ष, देवजाळी, हिवरे तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी रंजनाचा पती अविनाश बंडू तांबे, दीर संतोष बंडू तांबे, सासरे बंडू लक्ष्मण तांबे, सासू बायडाबाई बंडू तांबे (सर्व रा. देवजाळी) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बुधा बबन ठवरे (रा. ढवळपुरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली.

रंजना तांबे हिचा विवाह अविनाश बंडू तांबे याच्याशी २००९ साली झाला होता. लग्नानंतर तीन वर्षांनी रंजनाला नवरा, सासू, सासरे, दीर हे मानसिक त्रास देऊन मारहाण करून शिवीगाळ करत होते. रंजना गरोदर असतानाही अवजड कामं करायला लावली जात होती. त्यामुळे विवाहितेचा एकदा गर्भपातही झाला होता. अशात रंजना यांना दोन मुली झाल्याने दोन वर्षांपूर्वी आरोपी नवऱ्यानं दुसरं  लग्न करायचं ठरवलं होतं.

आरोपी नवऱ्याला मुलगा हवा होता, त्यामुळे त्याने दुसऱ्या लग्नाची तयारी केली होती. परंतु रंजना यांनी नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केला त्यामुळे तिला 8 जून 2021 रोजी मारहाण करण्यात आली. त्यामुळे मानसिक दबावाखाली आलेल्या विवाहितेनं 9 जून 2021 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह शिवहरीनगर येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. यानंतर संतप्त झालेल्या माहेरच्यांनी विवाहितेचा मृतदेह नवऱ्याच्या घरासमोरचं जाळला. याप्रकरणी माहेरच्यांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.