जेलमध्ये झालेल्या भांडणातून पुरंदर तालुक्यातील पोमणनगर येथील व्यक्तीचा खून; सराईत गुन्हेगाराला अटक
सातारा : वाठार बुद्रुक (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील निरा उजवा कॅनॉलमध्ये ८ जून रोजी अनोळखी मृतदेह आढळून आला होता. आरोपीने या मृतदेहाची ओळख नष्ट केली होती. अशा प्रकारचा हा
क्लिष्ट स्वरूपातील खुनाचा गुन्हा लोणंद पोलिसांनी उघडकीस आणून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.दरम्यान, हा खून येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असताना झालेल्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मंगेश सुरेंद्र पोमण (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी लोणंद पोलिसांनी वैभव सुभाष जगताप (वय २८, रा. पांगारे, ता. पुरंदर, जि. पुणे) या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. अटकेतील जगताप याचा साथीदार फरारी असून, त्याचा शोध सुरू आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यानी दिलेल्या माहितीनुसार, वाठार बुद्रुक (ता. खंडाळा) येथील नीरा उजवा कालव्यात ८ जून रोजी विवस्त्रावस्थेतील युवकाचा मृतदेह सापडला होता. त्या युवकाचा गळा दाबून खून केल्याचे शवविच्छेदनानंतर समोर आले होते. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या सूचनेनुसार लोणंदचे सहायक निरीक्षक विशाल वायकर करत होते. यासाठी वायकर यांनी उपनिरीक्षक गणेश माने, सहायक फौजदार शौकल सिकिलकर, देवेंद्र पाडवी, कर्मचारी महेश सपकाळ, अंकुश इवरे, अविनाश नलवडे, संतोष नाळे, ज्ञानेश्वर मुळीक, श्रीनाथ कदम, अभिजित घनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, विठ्ठल काळे, फैयाज शेख, अमोल पवार, शशिकांत गार्डी, गोविंद आंधळे, केतन लाळगे, प्रिया दुरगुडे, मल्हारी भिसे यांची पथके केली होती.
तपासादरम्यान तो मृतदेह पोमणनगर येथील मंगेश पोमण याचा असल्याचे समोर आले. बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार येरवडा कारागृहात शिक्षा भोगणारा पोमण हा काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आल्याचे पोलिसांना समजले. यानुसार पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान येरवडा कारागृहात असताना पोमण याची खून व इतर गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या वैभव सुभाष जगताप आणि ऋषिकेश दत्तात्रय पायगुडे (रा. कुडजे, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याशी वाद झाल्याचे समजले, तसेच जगताप आणि पायगुडे हेदेखील कारागृहातून जामिनावर बाहेर असल्याचे समजले.
यानुसार पोलिसांनी पांगारे येथे जाऊन जगताप याला ताब्यात घेतले. चौकशीत जगतापने कारागृहात झालेल्या वादाच्या रागातून मंगेश पोमण याचा पायगुडेच्या मदतीने गळा दाबून खून करत मृतदेह वाठार बुद्रुक येथे टाकल्याची कबुली दिली. यानुसार जगतापला अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार पायगुडे हा फरारी आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!