पायी वारी नाहीच, मानाच्या दहाही पालखी संस्थानांचा सरकारला पाठिंबा…

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यभर अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. धार्मिक कार्यक्रमांना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. याचाच परिणाम आता महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळ्यावर देखील झाला आहे.
महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाहीये. असा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. या निर्णयाला देहू, त्याचबरोबर आळंदी देवस्थाननंही विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. मात्र वारीसाठी काही दिवस शिल्लक असताना नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीत दहाही संस्थानांच्या विश्वस्तांनी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या बसने पालखी नेण्याच्या निर्णयाला जरी वारकऱ्यांनी सहमती दर्शवली असली तरी वारकरी प्रतिनिधींनी काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. ‘राज्य सरकारचा निर्णय मान्य आहे. पण प्रस्थान सोहळ्याला देण्यात आलेली 100 वारकऱ्यांची परवानगी ही मर्यादा वाढवा. वाखरीपासून पायी चालत जाण्यास परवानगी आहे, मात्र त्याची रुपरेषा जाहीर करा. शासनाने निर्णय जाहीर केलाय. मात्र अद्यापही लेखी आदेश मिळाला नाही, तो6 जाहीर करा’, अशा प्रमुख मागण्या वारकरी प्रतिनिधींनी सरकारकडे केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. ‘यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील,’ असा इशारा आज त्यांनी दिला . तर आता आषाढी वारीच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी देहू संस्थानच्या विश्वस्तांनी केली होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.