कबुतर चोरीला विरोध केल्याने बापलेकावर कोयत्याने वार ; हडपसरमधील घटना

पुणे : मध्यरात्रीच्या सुमारास पाळलेल्या कबुतरांची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना विरोध करणाऱ्या बापलेकावर तिघांनी कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील सय्यदनगर येथे घडली.वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

रामपाल, साजिद नदाफ आणि एका अनोळखी व्यक्तीवर
हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मोहम्मद खान (वय 44, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्यादीचा मुलगा हसनअलीने त्यांच्या घराच्या आवारातच कबुतरे पाळली आहेत.शुक्रवारी पहाटे सव्वा तीन ते पावणे चार वाजण्याच्या सुमारास आरोपी हसनअलीने पाळलेली कबुतरे चोरुन नेत असताना त्यांच्या मुलाने पाहिले. त्याने त्यांना विरोध केला. तेव्हा, आरोपींनी हसनअलीला धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यास कटर फेकून मारला. त्यामध्ये त्यास गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी त्यास कोयत्याने मारताना फिर्यादींनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या डोक्‍यावर कोयत्याचा वार केला, मात्र फिर्यादींनी कोयत्याचा वार चुकविण्यासाठी हात डोक्‍यावर ठेवला. त्यामुळे फिर्यादीच्या हाताची बोटांवर वार झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करीत हत्यारे हवेत फिरवून नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.