चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई :- चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत बहुतांश क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने जंगलालगतच्या गावांत हिंस्र प्राण्यांचा वावर अधिक आहे. हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तीय हानी झालेली आहे. शेतपिकांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रान डुक्करांबाबतच्या धोरणात बदल करून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान व मानवी पशुहानीबाबत प्रलंबित नुकसान भरपाईबाबत बैठक झाली.
मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत बहुतांश क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने जंगलालगतच्या गावांत हिंस्र प्राण्यांचा वावर अधिक आहे. या परिसरात एकूण ८५ वाघ असून आजतागायत ५१ गावांत वाघांचे हल्ले झाले आहेत. या हिंस्र प्राण्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत गावालगतच्या जंगलव्याप्त क्षेत्रास जाळीचे कुंपण करण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत ५० कोटींची तरतूद असलेल्या प्रस्तावासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत १९ नागरिकांचा मृत्यू झाला असून ६९ नागरिक जखमी झाले आहेत. खरीप हंगाम सुरु झाला असून वन्यप्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्यांना लवकर पैसे देण्याचे सूचित करून सौरऊर्जा कुंपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही यावेळी वडेट्टीवार यांनी दिले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!