पिंपरी चिंचवड मधील नाशिक फाटा पुलाखाली आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह, ओळख पटवण्याचं आव्हान

पिंपरी चिंचवड :काही दिवसांपूर्वी पुण्यातील फुरसुंगी परिसरात कालव्यात दोन मृतदेह वाहून आले होते. एका पुरुषाचा मृतदेह कालव्यातून वाहत आल्यानंतर काही मिनिटांत याठिकाणी एका महिलेचा मृतदेह देखील वाहत आला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड मधील नाशिक फाटा पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाण्याच्या संबंधित महिलेचा मृतदेह आढळला. मात्र या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. सांगवी पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला आहे. त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यास मदत होईल.

महिलेचे वर्णन

मयत महिलेचा रंग गोरा असून केस काळे आहेत. मध्यमवयीन असलेल्या महिलेने काळ्या रंगाचा स्वेटर घातलेला आहे. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास सांगवी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक फाटा पुलाखाली हा मृतदेह आढळला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. अद्याप कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नसून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही पुरावा हाती लागतोय का? याची चाचपणी देखील पोलिसांकडून केली जात आहे.

फुरसुंगी कॅनॉलमध्ये पुरुषाचा मृतदेह

पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फुरसुंगी गावात कॅनॉलमध्ये मे महिन्यात दोन मृतदेह सापडले होते. फुरसुंगी येथे कॅनॉलमध्ये एका पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेचाही मृतदेह वाहत येताना दिसला

अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांनी पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी एका महिलेचाही मृतदेह वाहत येत असल्याचे जवानांना दिसले. त्यांनंतर जवानांनी महिलेचा मृतदेहही कॅनॉलमधून बाहेर काढला. दोन्ही मृतदेह लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.