आमच्याकडे चावी आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच उघडू: संजय राऊत

मुंबई: मराठा आरक्षणासाठी आज (१६ जून) मराठा मूक मोर्चा सुरु झाला आहे. कोल्हापूरात याची सुरुवात खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. दरम्यान, याच विषयावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलला आहे. मराठा आंदोलनाला सर्व घटकांचा पाठिंबा आहे. आता केंद्राने तात्काळ त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी करतानाच आमच्याकडे चावी आहे, आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न उघडू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली आहे.

कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे. कोल्हापुरातून मराठा आरक्षणासंदर्भात जी आंदोलनाची सुरुवात झाली, त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या सर्वच घटकांची सहानुभूती आणि पाठिंबा आहे. या आंदोलनात सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत. त्यात छत्रपती संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे स्थानिक खासदार धैर्यशील माने आणि काँग्रेसचे काही नेते ही सहभागी झाले आहे. कोल्हापुरातील आंदोलन नसून मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा यासाठी केंद्राकडे या नेत्यांनी साकडं घातलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच या प्रश्नावर तोडगा काढेल अशी आम्हाला खात्री आहे, असं राऊत म्हणाले.

चावी होती म्हणून तुमच्या सत्तेला टाळं

यावेळी राऊत यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली. मला चावी दिली जाते असं दानवे म्हणत आहे. खरंतर चावी द्यावीच लागते. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना अनेकजण चावी देत असतात. सल्ले देत असतात. त्यामुळेच सरकार चालतं. चावी देणं म्हणत असाल तर चावी फार महत्त्वाची आहे. दीड वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती. त्यामुळे तुमच्या सत्तेला टाळं लागलं. आणि आमच्या सत्तेचं टाळं उघडलं. चावी आणि टाळं फार महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे चावी असते ते कुणालाही टाळं लावू शकतात. आमच्याकडे चावी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही उघडू, असं ते म्हणाले. दानवे मित्रं आहेत. उत्तम विनोद करतात. चांगलं ग्रामीण नेतृत्व आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

कोल्हापुरात मूक मोर्चा सुरू

दरम्यान, कोल्हापुरात मराठा आरक्षण मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हा मूक मोर्चा सुरू झाला आहे. श्रीमंत शाहू महाराजही या मोर्चाला उपस्थित आहेत. या मोर्चाला स्वत: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर उपस्थित आहेत. तसेच आमदार, खासदार आणि अनेक मंत्र्यांनी या मोर्चाला हजेरी लावली असून भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मोर्चा स्थळी जाऊन भाजपच्या पाठिंब्याचं पत्र संभाजी छत्रपती यांना दिलं. या मोर्चामध्ये शेकडो आंदोलक सहभागी झाले आहेत. काळा पोशाख परिधान करून हा मूक मोर्चा सुरू आहे

संजय राऊत यांचा बोलविता धनी वेगळाच : रावसाहेब दानवे
गेल्या काही दिवसापासून संजय राऊत सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. परंतु त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, असं म्हणत दानवेंनी संजय राऊतांवर निशाना साधला. संजय राऊत यांना चावी दिली की ते बोलतात पण आता लोक संजय राऊतांना गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.