कर्नाळा बँक घोटाळा भोवला; माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

पनवेलः कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील विवेक पाटील हे प्रमुख आरोपी आहेत. मुंबई ईडी झोन-२चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी पाटील यांना त्यांच्या पनवेलमधील घरातून ताब्यात घेतले आहे. राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तीन महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशील कुमार यांच्याकडे लेखी कैफियत मांडली होती. त्यानुसार अखेर  पाटील यांना अटक करण्यात आली.रात्री त्यांच्या निवासस्थानी छापा मारून ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कर्नाळा बँकेकडून बनावट कर्ज प्रकरणे व गैरव्यवहारांतून गेल्या काही वर्षांत ५२९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी दोषीवर कारवाई व्हावी, यासाठी दीर्घकाळ आंदोलन केले होते. अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने सहकार खाते, स्थानिक तपास यंत्रणेसह ईडीकडे तक्रार करण्यात आली.

पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याबाबत पुढाकार घेतला होता. त्यानंतर प्रमुख संशयित, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर ईडीकडून मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणेच्या रडारवर होते. त्यांची वाहने व मालमत्तेवर ईडीने यापूर्वीच टाच आणली असून गुंतवणूक असलेली विविध बँक खाती सील केली आहेत.

न्यायालयाकडून अटक टाळण्यापासून संरक्षण न दिल्याने त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मुंबई ईडी झोन-२चे सहायक संचालक सुनील कुमार यांनी मंगळवारी रात्री त्यांना रायगड येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे यांची नियुक्ती करून पूर्नतपासणी केल्यानंतर ६३ कर्ज खात्याद्वारे ५१२ कोटीचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर चौकशीत तो आकडा ५२९ कोटीवर गेला आहे.

पनवेल संघर्ष समितीने सहकार खाते, गृहखात्याच्या गुप्तवार्ता विशेष गुन्हे शाखा (सीआयडी) आणि ईडीच्या प्रमुखांना भेटून सखोल चौकशी आणि आरोपींच्या अटकेची मागणी करत पाठपुराव्याचा रेटा लावला होता. त्यानुसार सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधववार यांनी दिलेल्या निर्णयावर पनवेल संघर्ष समितीने आक्षेप घेत पूर्नचौकशीची मागणी सहकार सचिवांकडे केली आहे.

५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदार

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले. कर्नाळा बँकेत ५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांच्या ठेवी आहेत. यामध्ये पनवेल, उरणमधील स्थानिकांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात आहेत.   महाविकास आघाडी सरकार विवेक पाटील यांना कारवाईपासून वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार महेश बालदी हे विवेक पाटील यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्नशील होते. दोन्ही आमदारांनी ठेवीदारांना घेऊन मोर्चेदेखील काढले होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.