एटीएम फोडणारी टोळी अटकेत ; भोसरी पोलिसांची हरियाणामध्ये कारवाई

 

पिंपरी चिंचवड :‘एसबीआय’चे एटीएम गॅस कटरने कापून मशीनमधून पैसे ठेवण्याच्या ट्रेसह 22 लाख 95 हजार 600 रुपयांची रोकड पळवणा-या टोळीला भोसरी पोलिसांनी अटक केली. भोसरी पोलिसांनी हरियाणात जाऊन ही कारवाई केली आहे. भोसरी परिसरातील पांजरपोळ येथे 9 जून रोजी रात्री साडेदहा ते 10 जून रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला होता.

अकरम दीनमोहम्मद खान (वय 23, रा. मु. बदोपुर, पो. रावली, तहसील फिरोजपुर झिरका जि. नुहु (मेवात) राज्य हरियाणा), शौकीन अक्तर खान (वय 24, रा. मु. बदोपुर, पो. रावली, तहसील फिरोजपुर झिरका जि, नुहु (मेवात) राज्य हरियाणा), अरसद आसमोहम्मद खान उर्फ सोहेब अख्तर (वय 46, रा. रहाडी, ता. तौरू, जि. नुहु राज्य हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे आणखी तीन साथीदार फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.अरविंद विद्याधर भिडे (वय 58, रा. सहकार नगर, पुणे) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. 11) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पांजरपोळ येथे पुणे-नाशिक महामार्गावर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)चे एटीएम आहे. 9 जून रोजी रात्री साडेदहा ते 10 जून रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले. त्यानंतर मशीनमधून पैशांच्या चार कॅसेट चोरट्यांनी चोरून नेल्या. यामध्ये 22 लाख 95 हजार 600 रुपये रोख रक्कम होती. तसेच चोरट्यांनी 30 हजार रुपयांचे एटीएमचे नुकसान केले असल्याचेही फिर्यादीत म्हटले होते.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अशा प्रकारच्या चो-या हरियाणा व राजस्थान भागातील लोक करतात, असा अंदाज बांधला. त्यानुसार संबंधित परिसरातील नागरिक, वाहने घटनास्थळी व परिसरात आली आहेत का याची माहिती काढली. पोलिसांचा संशय खरा ठरला. हरियाणा येथील एक ट्रक घटनास्थळी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो ट्रक भोसरीमधून हरियाणा येथे जात असताना मोशी टोलनाक्यावर अडवून ट्रक (आर जे 09 / जी बी 8093) ताब्यात घेतला. ट्रक चालक अकरम दीनमोहम्मद खान याच्याकडे तपास केला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या घटनेत त्याच्या वाट्याला आलेले तीन लाख 74 हजार 500 रुपये आणि ऑक्सिजन सिलेंडर जप्त केला.

आरोपी खान याने त्याच्या साथीदारांची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी थेट हरियाणा गाठले. तिथून अन्य दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या वाट्याला आलेले दोन लाख 50 हजार रुपये आणि एटीएम मशीनमधील ट्रे पोलिसांनी जप्त केले. त्यांचे आणखी तीन साथीदार फरार आहेत.

आरोपींनी नियोजनबद्धरित्या एटीएम फोडण्याचा प्लॅन केला. त्यात ट्रक चालकाला देखील सामील करून घेतले. 5 जून रोजी ही टोळी हरियाणा येथून चोरी करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवडकडे निघाली. चोरी करताना गॅस कटर करीता गॅस ऑक्सिजन सिलेंडर लागेल म्हणून टोळीने मंचर येथील नाशिक-पुणे महामार्गाच्या बाजुला असलेल्या सिध्दी हॉस्पिटलसमोर पार्क करून ठेवलेल्या रुग्णवाहिकेतून 6 जून रोजी मध्यरात्री सिलेंडर चोरला. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दोन दिवस या टोळीने भोसरी परिसरातील एटीएमची पाहणी केली. त्यात त्यांना पांजरपोळ येथील एटीएममध्ये सुरक्षा रक्षक, अलार्म अशा बाबींचा अभाव दिसून आला. तसेच एटीएम निर्मनुष्य असल्याने टोळीने हे एटीएम फायनल केले.

10 जून रोजी मध्यरात्री या टोळीने एसबीआयचे एटीएम फोडले. त्यानंतर सर्व साहित्य जागेवर सोडून पैशांच्या ट्रेसह 22 लाख 95 हजार 600 रुपयांची रोकड चोरून नेली. या गुन्हयात पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांचे आणखी तीन साथीदार अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून चोरलेल्या रकमेपैकी 6 लाख 24 हजार 500 रुपये रोकड, गुन्हा करताना वापरलेला ट्रक, गॅस कटर, घरगुती वापराची एक गॅस टाकी, मेडिकल वापराचे दोन ऑक्सिजन सिलेंडर, एटीएममधील पैसे ठेवण्याचे तीन ट्रे, दोन कोयते, तीन मोबाईल फोन असा एकूण 26 लाख 33 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवी भवारी, पोलीस अंमलदार राकेश बोयणे, अजय डगळे, गणेश हिंगे, बाळासाहेब विधाते, सागर भोसले, समीर रासकर, संतोष महाडिक, सागर जाधव, आशिष गोपी, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, राजू जाधव यांच्या पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.