अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या सराईताला अटक, विश्रामबाग पोलिसांची कामगिरी

पुणे : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर दोघांमध्ये झालेल्या मैत्रीच्या तपासातून ही बाब समोर आली. आरोपी नऱ्हे, सिंहगड, चाकण, सांगली, सातारा तसेच परराज्यांत पोलिसांना गुंगारा देऊन ठिकाणे बदलून पीडित मुलीसह राहत होता. अखेर नीरा येथे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली आहे. गेले दोन महिन्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

अभिषेक विकास रानवडे  (वय 29, रा.620 नारायण पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक याने 24 एप्रिलला अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. यानंतर तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याच दरम्यान, मुलीचा शोध लागत नसल्याचा चिंतेतून मुलीचे वडील अस्वस्थ होते. यातच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले होते. मुलीचा शोध पोलीस घेत नसल्याचे नातेवाईकांनी म्हंटले होते.यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पथक तयार करून या आरोपीचा शोध सुरू केला होता.

नर्हे,  सिंहगड, चाकण, सांगली, सातारा भागात गेल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार शोध सुरू होता. यादरम्यान रानवडे मुलीबरोबर बारामतीत असल्याची माहिती उपनिरीक्षक राकेश सरडे, बाबा दांगडे, प्रशांत शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे आणि तपास पथकातील कर्मचारी बारामती येथे रवाना झाले. आरोपी मुरूम गावात असल्याचे पोलिसांना समजले. मात्र, आरोपीला पोलिसांची चाहूल लागल्याने तो नीरा येथे लपून बसला. पोलिसांनी सापळा रचून त्याला अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका केली.

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहाय्यक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय टिकोळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक कुंडलीक कायगुडे, उपनिरीक्षक राकेश सरडे, खानविलकर, पूनम पाटील, संजय दगडे, बाबा दांगडे, प्रशांत शिंदे यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.