गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावंस वाटलं, पण…! अजित पवारांची नाराजी
पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा उद्घटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काल (१९ जून) झालेला हा कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.यावेळी कार्यालय परिसरात मोठ्या संख्येनं गर्दी जमली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकार गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच समोर करोनाच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचं दिसून आलं. दरम्यान, स्वतः अजित पवारांनीही कार्यक्रमात बोलताना या संपूर्ण प्रकाराबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. “गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला होता. पण सगळेच नाराज झाले असते”, असे अजित पवार म्हणाले.
पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घटनादरम्यान झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त करताना अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले कि, “गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्ते नाराज झाले असते. लोकांमध्येही नाराजी दिसली असती. मी प्रसादला सांगितलं होतं की अतिशय साधेपणाने, नियमांचं तंतोतंत पालन करुन आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही जनतेला आवाहन करतो की, आपण नियमांचं पालन करा आणि मलाच एका कार्यक्रमात बोलवलं जात आणि इतक्या अडचणीत टाकलं जातं की धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही अशी माझी अवस्था झाली आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो”, असे अजित पवार म्हणाले
करोनाची रुग्ण संख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी गर्दी करता कामा नये, सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहन प्रत्येक वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे करताना दिसत आहेत. आज दुपारी देखील पत्रकार परिषदेत नागरिकांना गर्दी करू नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं. पण तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती
दरम्यान, कार्यक्रम झाल्यानंतर गर्दीविषयी अजित पवारांना विचारणा केली गेली. त्यावेळी. “कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक करावाई करण्यासाठी मी पोलिसांना सांगणार आहे”, असं अजित पवार म्हणाले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!