दोन लग्न झालेले असतानाही लग्नाच्या अमिषाने तरुणीवर अत्याचार ; औरंगाबादमधील घटना
औरंगाबाद : दोन लग्न झालेले असतानाही तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपीला छावणी पोलिसांनी शनिवारी (१९ जून) रात्री दहा वाजता अटक केली.
अख्तर सैय्यद अहमद (२६, रा. तुळजापूर, हर्सूल सावंगी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका रुग्णालयात काम करणाऱ्या पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला आरोपी अख्तर याने हर्सूल येथील एका लॉनचा मालक असल्याचे भासवून भेटण्यासाठी बोलावले होते. ही तरुणी लॉनवर गेल्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केले. पैशाची अडचण असल्याचे सांगून तरुणीचे एटीएम कार्ड घेऊन त्याच्यातून वेळोवेळी पगाराचे पैसे काढून घेतले. आरोपी अख्तरचे पुर्वी दोन लग्न झालेले असून, त्याला दोन मुले असल्याची माहिती तरुणीला मिळाली. त्यानंतरही, तुला मी सोडणार नाही, तुझ्यासोबत लग्न करणारच असल्याचे आश्वासन दिले. १२ मार्च रोजी त्याने पडेगाव येथे भाड्याने रुम घेतली व आपण लग्न करून येथे राहू, असे सांगत पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर लग्नाबाबत विचारणा केली तर तरुणीला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सैय्यद अख्तर अहेमद याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने सैय्यद अख्तर याला सोमवारपर्यंत (२१ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!