पुण्यात कोरोनावरील बनावट औषधांची विक्री, एकाला अटक ; मेडिकल मार्केटमध्ये खळबळ

पुणे : कोरोना विषाणूच्या उपचारांत वापरल्या जाणाऱ्या औषधांचं नाव वापरून बनावट औषध विक्री केल्याप्रकरणी सदाशिव पेठेतील ‘उमेद फार्मा सेल्स’विरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ‘उमेद फार्मा सेल्स’चे भागीदार असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे

प्रभाकर नामदेव पाटील (रा कल्याणीनगर) असे अटक केलेल्याचे नाव असून ते उमेद फार्मा सेल्स कंपनीचे भागीदार आहेत. यासोबतचं मॅक्सरिलीफ हेल्थकेअर या औषध कंपनीचे संचालक सुदीप सुरेशकुमार मुखर्जी (वय 32, रा. मुंबई, मूळ. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विश्रामबाग पोलीस ठाण्यात  विवेक खेडकर (वय 40)यांनी तक्रार दिली आहे.

मॅक्सरिलीफ हेल्थकेअर ही कंपनी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अंजी येथील असून या कंपनीत बनावट औषधे तयार केल्याचं निष्पन्न झालं आहे. शिवाय या कंपनीकडे औषधे निर्मिती करण्याचा कसलाही परवाना नाही.

संबंधित कंपनीत कोरोना विषाणूच्या संसर्गावर महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या फॅविपिराविर आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधांचं नाव वापरून बनावट औषध निर्मिती केली जात होती. अलीकडेच पोलिसांनी मुंबईतून १ कोटी ५४ लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत. त्याचबरोबर सुदीपकुमार मुखर्जी यालाही अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या अन्न आणि औषध प्रशासनानं मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनीबाबत हिमाचल प्रदेशात विचारणा केली असता, संबंधित कंपनीकडे औषध निर्मिती करण्याचा परवाना नसल्याचं समोर आलं आहे. ही कंपनी विना परवाना पाच वेगवेगळ्या औषधांची निर्मिती करत असल्याचं तपासात उघड झालं आहे.

देशातील अनेक शहरात या औषधाचं वितरण झाल्याची संशय पोलिसांना आहे. असाच प्रकार पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात सुरू असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली. ही औषधं सदाशिव पेठेतील उमेद फार्मा सेल्सच्या मदतीनं पुणे शहर आणि जिल्ह्यात विक्रीस पाठवण्यात आल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विश्रामबाग पोलीस याचा तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.