भरदिवसा ८ लाखाची लूटमार करणाऱ्या ५ आरोपींना अटक, १० लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : पेट्रोल पंपावरील रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी घेऊन निघालेल्या कर्मचाऱ्याला भररस्त्यात अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याजवळील रोख ८ लाख ७४ हजार रुपये लुटून नेणाऱ्या पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या पथकाने आठ दिवसाच्या आत अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ९ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यातील एकजण हा पेट्रोल पंपावरील कर्मचारी आहे.

उबेद अन्सार खान (वय २०,रा. सैय्यदनगर, हडपसर), अरबाज नवाब पठाण (वय १९ रा. हांडेवाडीरोड हडपसर), तालीम आसमोहम्मद खान (वय २० रा. सय्यदनगर, हडपसर), अजीम उर्फ आंट्या महमद हुसेन शेख (वय २२ रा. सय्यदनगर, हडपसर) आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी प्रजोत कानिफनाथ झांबरे ( वय २० रा. चिंतामणीनगर मगर पंपाजवळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील मगर पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक १४ जूनला बँकेत रोकड भरण्यासाठी घेवुन चालले होते. त्यांची गाडी सय्यदनगर येथे आल्यानंतर आरोपींनी रस्त्यामध्ये मोटारसायकल अडवून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील पैशाची बॅग हिसकावून तेथून पसार झाले होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या पथकाला सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, आरोपींचा तपास करीत असताना, पथकाने सलग तीन दिवसांमध्ये सुमारे १९ किलोमीटर अंतरामध्ये तब्बल २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आरोपींची ओळख पटवली आणि त्यानंतर या पाचही जणांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत मौजमजा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी हा लुटीचा डाव रचला. यासाठी पेट्रोल पंपावरील कर्मचारी प्रजोत याला देखील या कटात सहभागी करून घेतले. त्याच्याकडून पेट्रोल पंपावरील, तेथे जमणाऱ्या पैशाची माहिती घेऊन हा गुन्हा केला.

या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी उबेद हा सराईत गुन्हेगार आहे. पुण्यासह एकूण चार गुन्ह्यात तो फरार असल्याचे समोर आले आहे. तर इतरही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक संतोष तासगावकर, प्रसाद लोणारे, कर्मचारी महेश वाघमारे, अश्रूबा मोराळे, अजय गायकवाड, रमेश साबळे, प्रवीण काळभोर, दीपक लांडगे, दत्ता ठोंबरे, चेतन चव्हाण, विशाल भिलारे, विनोद शिवले, दाऊद सैय्यद, प्रमोद टोळेकर, अमरचंद्र उगले, विलास खदारे, संजय दळवी, स्वाती गावडे, स्नेहल गावडे यांच्या पथकांस केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.