टपरीवरून सिगारेट आणली नाही म्हणून तरुणावर खुनी हल्ला, पिंपरीतील घटना

पिंपरी चिंचवड : रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला घोळका करून थांबलेल्या टोळक्यातील एकाने घरी जात असलेल्या एका तरुणाला अडवून टपरीवरून सिगारेट आणण्यास सांगितले. त्यासाठी पादचारी तरुणाने नकार दिला. या कारणावरून घोळका करून थांबलेल्या टोळक्याने तरुणावर कोयते, चाकू आणि दगडाने मारुन खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. २२) रात्री इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

सतीश उर्फ रोहित देविदास शिंगाडे (वय २२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी (दि. २३) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार उमेश संभाजी पवार, अमोल संभाजी पवार, गोपल्या दांडे, बाळ्या उर्फ कृष्णा शिवाजी वारभवन, व्यंकटेश म्हेत्रे (सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) आणि अन्य तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी सतीश हे त्यांचा मित्र आक्रमक खान यांचा वाढदिवस करून इंदिरानगर येथील टपरीवरून बडीशेप घेऊन घरी जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला आरोपी घोळका करून थांबले होते. त्यातील आरोपी अमोल पवार याने फिर्यादी यांना मारून शेजारच्या टपरी वरून सिगारेट घेऊन येण्यास सांगितले. त्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला. ‘मी आता घरी चाललो आहे. तू दुसऱ्या कोणाला तरी सांग’, असे फिर्यादी यांनी आरोपीला सांगितले.

त्याचा राग आल्याने आरोपी अमोल पवार याने फिर्यादी यांच्या गालावर चापट मारली. त्याचा फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला. त्यानंतर सर्व आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांना शिवीगाळ करत कोयते, चाकू आणि दगडाने डोक्यात, पोटावर आणि अंगावर ठिकठिकाणी मारून खूनी हल्ला केला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.