स्वस्तात वस्तूचा फंडा, अन् टिळक रस्त्यावरील लॅपटॉप विक्रेत्याला 15 लाखांचा गंडा
पुणे : स्वस्तात लॅपटॉप घेऊन देण्याचे आमिष दाखवत टिळक रस्त्यावरील एका व्यापाऱ्याची 15 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली.फसवणूक करणारा देखील लॅपटॉप विक्रेता आहेमार्च ते जून 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत लिलेश कुमार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी केतन सुनील पळसकर (वय 36, नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादीचे गजबजलेल्या रस्त्यावर लॅपटॉप दुरुस्ती आणि विक्रीचे दुकान आहे. तर आरोपीचे देखील याच परिसरात कार्यालय आहे. दोघेही ओळखीचे असल्यामुळे त्यांचे रोज बोलणे होत असे.
काही दिवसांपूर्वी आरोपी भरतकुमार यांनी फिर्यादीला विश्वासात घेत एकाच वेळी शंभर लॅपटॉप विकत घेतले तर स्वस्तात मिळतील असे सांगितले. फिर्यादीने देखील त्याच्यावर विश्वास ठेवत लॅपटॉप खरेदी करण्याची तयारी दर्शवली.
त्यासाठी फिर्यादीने भरतकुमार याला आधी पाच लाख आणि नंतर दहा लाख असे वेळोवेळी पंधरा लाख रुपये दिले. पैसे आरटीजीएसने दिले होते. पैसे दिल्यानंतर दोन दिवसात लॅपटॉप मिळतील असे, त्यांना सांगण्यात आले होते. मात्र पैसे देऊनही काही दिवस झाले तरी लॅपटॉप मिळाले नाहीत. एक ते दीड महिना झाल्यानंतर फिर्यादी यांनी त्याला विचारपूस केली असता तो टाळाटाळ करू लागला. तर नंतर त्याने फोन उचलणे देखील बंद केले. यामुळे फिर्यादी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. अधिक तपास उपनिरीक्षक सरडे हे करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!