पाच अट्टल दरोडेखोरांना अटक करत ९५ तोळे सोन्याचे दागिने जप्त ; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पिंपरी चिंचवड :

अट्टल दरोडेखोर आणि घरफोडी करणाऱ्या 5 आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद, अक्कलकोट येथील जंगलातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कारवाईनंतर दरोड्याचा एक आणि घरफोडीचे पाच असे सहा गुन्हे उघडकीस आले आहे. आरोपींकडून ४७ लाख ५० हजार रुपयांचे ९५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार, आप्पा रा. भोसले (वय ४०, रा. सिंदगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) त्याची साथीदार पत्नी सारिका संतोष चौगुले उर्फ पायल आप्पा भोसले, अक्षय मंगेश शिंदे (वय २२, रा. काजी तडमस, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), अजय रिका उर्फ राहुल पवार (रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार: रात्रीच्या वेळी घराच्या खिडक्यांचे गज कापून आत प्रवेश करून घरफोडी व चोरी करणाऱ्या टोळीपैकी एक आरोपी लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार हा औरंगाबाद येथे नातेवाईकाकडे आश्रयास आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून औरंगाबादमधील वाळुंज येथून त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे चौकशी करून त्याने चोरी केलेले ३३ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

आरोपी लिंग्या याला तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यात वर्ग करून अधिक तपास केला असता त्याने त्याच्या चार साथीदारांची नावे सांगितली. तसेच, त्याच्याकडून आणखी १५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

लिंग्या याचे साथीदार अक्कलकोट, सोलापूर, उस्मानाबाद, करमाळा येथील जंगलभागात वास्तव्य करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांना मिळाली. त्यानुसार चार टीम तयार करून आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आल्या. पोलिसांनी अक्कलकोट परिसरात वेशांतर करून चार दिवस वॉच ठेवून जंगलात वास्तव्य करणाऱ्या आप्पा भोसले, त्याची पत्नी सारिका आणि अक्षय या तिघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांचा पाचवा साथीदार अजय याला देखील पोलिसांनी अटक केली.

सर्व आरोपींकडून पोलिसांनी एकूण ४७ लाख ५० हजारांचे ९५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. या कारवाईमुळे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तीन, देहूरोडमधील दोन घरफोडीचे, तर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील दरोड्याचा एक, असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आणखी पाच घरफोडीच्या गुन्ह्यात हे आरोपी पसार होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस अंमलदार धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसोडे, नितीन बहिरट, सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत दयानंद खेडकर, धनंजय भोसले, संदीप ठाकरे, राजकुमार इघारे, श्यामसुंदर गुट्टे, गणेश मालुसरे, गोपाळ ब्रह्मादे, राजेंद्र शेटे, नागेश माळी, विकास आवटी, पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.