मोठी बातमी! राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी ईडीची छापेमारी
नागपूर :100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने पुन्हा छापेमारी केली असून आज सकाळपासून ही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीसोबत केंद्रीय सुरक्षा पथक देखील दाखल झाले आहेत महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत.
अनिल देशमुख यांच्या घरी ईडीकडून झडाझडती सुरू आहे. या तपासासाठी 6 ते 7 अधिकारी नागपुरातील देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपावरून अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं गुन्हा दाखल केला होता. 25 मे रोजी अनिल देशमुखांशी संबंधित नागपुरातील तिघांकडे ईडीने चौकशी केली होती.
काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. तसेच त्यांच्या निकटवर्तीय यांच्या घरावर देखील छापेमारी केली होती. आता परत ईडी अनिल देशमुखांच्या घरी पोहोचली आहे. दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच अनिल देशमुख हे काही दिवसानंतर तुरुंगात असतील, असाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सीबीआयकडून 11 तास चौकशी
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने (CBI) 21 एप्रिल रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर छापा टाकून सलग 11 तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.
यापूर्वी सीबीआयकडून 10 ठिकाणी छापे
दरम्यान, सीबीआयने 21 एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!