ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळं स्वप्निल लोणकर चा जीव गेला- चित्रा वाघ

पुणे;MPSC हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर असं या २४ वर्षाच्या तरुणाचं नावं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे.

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेल्याने त्यांने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी स्वप्निलला श्रद्धांजली वाहत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. स्वप्नील लोणकर MPSC उत्तीर्ण झालेल्या आमच्या भावाचा ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळं जीव गेला. त्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून अपेक्षित होते की, आपल्या नेहमीच्या पहाटेच्या आरवण्यात काहीतरी दोन शब्द बोलतील नाहीतर नेहमीप्रमाणे केंद्राला तरी दोष देतील. पण हे पुन्हा सिद्ध झाले की ते ‘प्रस्थापितांचे पोपट’आहेत, असा निशाणा चित्रा वाघ यांनी साधला आहे.

२ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, असं स्वप्निल पत्रात म्हटलं आहे.

नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले…. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील, असंही स्वप्निल आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.