शिक्षकांसाठी मोठी बातमी!शिक्षण सेवक भरतीला सुरुवात,६ हजार पदे भरणार

मुंबई;शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिल्यामुळे सुमारे तीन हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात यावी, असा निर्णय घेतला आहे.

१२ हजार ७० शिक्षण सेवक पदांसाठी भरती:

आतापर्यंत एकूण ९ हजार ८० शिक्षण सेवक पदांपैकी ५ हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, २०२० मध्ये पूर्ण झाली आहे. डिसेंबर, २०१७ मध्ये आयोजित केलेल्या ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड. कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षेतील गुणांच्या आधारे मुलाखत घेऊन अंतिम निवड करण्यात येणार आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.