पुणे-सोलापूर महामार्गावर दोन ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात,दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

लोणी काळभोर;पुणे – सोलापूर महामार्गावर आज पहाटे दोन ट्रक व कंटेनर या तीन अवजड वाहनांचा भीषण अपघात झाला.या विचित्र अपघातात ट्रकमधील ड्रायव्हर व क्लीनर मृत्यूमुखी पडले असून कंटेनर मधील एकजण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात ट्रकमधील ड्रायव्हर अनिल अंकुश व क्लिनर शकील इस्माईल शेख (वय- ३२, रा. बसवकल्याण,जि. बिदर, राज्य- कर्नाटक ), व अनिल अंकुश सूर्यवंशी (वय- ३५ , रा. केळगाव, ता. निलंगा, जि. लातूर ) हे दोघे मृत्यूमुखी पडले आहेत. तर कंटेनर मधील आण्णासाहेब गणपत गायकवाड (वय- ४४, रा. मुंढवा, पुणे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, सदर अपघात आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारांस कुंजीरवाडी गावच्या हद्दीत धनश्री लॉन्स मंगल कार्यालयासमोर झाला आहे. अपघातातील कंटेनर हा पुणे सोलापूर – महामार्गावरून उलट दिशेने येवून धनश्री लॉन्स मंगल कार्यालयासमोरून सोलापूर – पुणे महामार्गाकडे वळत होता. त्याचवेळी पुणे बाजूकडून सोलापूरकडे वेगाने निघालेला ट्रक त्याला धडकला. यामुळे ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. तर कंटेनरच्या केबिनची मागील बाजू चेंबली. याचवेळी आंध्र प्रदेश वरून पुणे बाजूकडे फरशी घेऊन निघालेला ट्रक कंटेनरला धडकला.

तिन्ही अवजड वाहणे एकमेकांना धडकल्याने मोठा आवाज झाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यास सदर माहिती कळवली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतू उपचारापुर्वीच ट्रक ड्रायव्हर व क्लीनर मृत्यूमुखी पडले होते.

सदरच्या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.