बनावट नोटा तयार करणारी टोळी गजाआड,३३ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड;बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा निगडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात कारवाई निगडी पोलिसांनी ३२ लाख ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.ओटास्कीम निगडी येथून सुरू झालेली कारवाई पंढरपूर, सातारा, मुंबईमार्गे गुजरातपर्यंत गेली. महाराष्ट्रातून तीन, तर गुजरातमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

गोरख दत्तात्रय पवार (वय ३०, रा.भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), विठ्ठल गजानन शेवाळे (वय ३८, रा. ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), जितेंद्र रंकनीधी पाणीग्रही (वय ३६, रा. नालासोपारा (पुर्व) वसई पालघर), राजू उर्फ रणजीत सिंह खतुबा परमार (वय ३८, रा. रानपुर काकरिया चौरा, ता.रानपूर, जि. बोटाद, गुजरात), जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल (वय २६), किरण कुमार कांतीलाल पटेल (वय ३८, दोघे रा. पालनपुर, ता. पालनपुर, जि. बनासकाठा गुजरात) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीमधील ओटास्कीम परिसरात एक व्यक्ती नकली नोटा घेऊन येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस संबंधित व्यक्तीच्या पाळतीवर होते. २३जून रोजी एक व्यक्ती गि-हाईक शोधण्यासाठी ओटास्कीम येथील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी गोरख पवार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन हजार रुपये दराच्या पन्नास नोटा आढळून आल्या. तसेच त्याच्याकडे असलेल्या दुचाकी (एम एच 13 / डी एल 0285) मध्ये दोन हजार रुपये दराच्या नोटांचे चार बंडल आढळून आले. पोलिसांनी सर्व नोटांचे एका बँकेकडून परीक्षण केले. त्यामध्ये आढळलेल्या सर्व नोटा नकली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी गोरख पवार याला अटक केली. त्याच्याकडून ५ लाख ८६ हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या.

आरोपी विठ्ठल शेवाळे याने नकली नोटा नालासोपारा पुर्व वसई येथील जितेंद्र पाणीग्रही याच्याकडून आणल्या असल्याचे सांगितले. पोलीस थेट जितेंद्र याच्या घरी गेले असता त्याला मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक जुलै रोजी आरोपी जितेंद्र याला न्यायालयातून वर्ग करून घेतले. जितेंद्र याने त्याचा गुजरात येथील साथीदार आरोपी राजू परमार याच्याकडून बनावट नोटा आणल्याचे सांगितले. मात्र त्याच्या वास्तव्याबाबत कोणतीही माहिती नसल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याची माहिती प्राप्त केली. गुजरातमधील म्हैसाना येथे पोलिसांनी आरोपी राजू याला एका लॉजवर बोलावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलीसांनी बनावट गिहाईक असल्याचा देखील बनाव केला. मात्र राजू याने पोलिसांना संपूर्ण दिवसभर ताटकळत ठेवले. त्यानंतर पुन्हा निगडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राजू याचा ठावठिकाणा शोधला. त्यावेळी तो बनासकाठा जिल्ह्यातील पालनपुर येथे असल्याचे समजले. पोलिसांनी पालनपुर येथे जाऊन आरोपी राजू परमार याला अटक केली. त्याच्याकडून १५ लाख ९३ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या.

आरोपी गोरख पवार याला या नोटा त्याचा सातारा जिल्ह्यातील मित्र विठ्ठल शेवाळे याने दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस विठ्ठल शेवाळे याच्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी गावात पोहोचले. आरोपी विठ्ठल शेवाळे साखर झोपेत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी विठ्ठल टोवाळे याच्याकडून तीन लाख ७० हजार ५०० रुपयांच्या नकली की नोटा पोलिसांनी जप्त केल्या.

आरोपी राजू परमार याने त्याच्याकडील बनावट नोटा जितेंद्रकुमार आणि किरणकुमार यांच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी जितेंद्रकुमार आणि किरणकुमार यांच्या घरून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पालनपुर येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेतली. त्यानंतर आरोपी जितेंद्रकुमार आणि किरणकुमार या दोघांकडून बनावट नोटा बनविण्यासाठी वापरलेला लॅपटॉप, कलर प्रिंटर जप्त केला. २४ जून रोजी या तपासाला निगडी पोलिसांनी सुरुवात केली. त्यानंतर सलग तब्बल १८ दिवस ११ जुलै २०२१ पर्यंत निगडी पोलिसांनी पुणे, सातारा, मुंबई आणि गुजरातमधील पालनपुर येथे तपास करून २ हजार रुपये दराच्या १ हजार ४०२, पाचशे रुपये दराच्या ९२९ असा एकूण ३२ लाख ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच लॅपटॉप, कलर प्रिंटर, दुचाकी असा एकूण ३३ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे कृष्णदेव खराडे, पोलीस निरीक्षक (सायबर शाखा) डॉ.संजय तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, उपनिरीक्षक आर.बी. बांबळे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, विक्रम जगदाळे, आनंद साळवी, सतीश ढोले, राजू जाधव, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके रमेश मावस्कर, भूपेंद्र चौधरी, तुषार गेंगजे, विलास केकाण, दिपक जाधवर, अमोल साळुखे, विकास आवटे, मनीषा पाटील यांच्या पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.