प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल,१ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त
भोसरी;शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून ठेवला तसेच त्याची बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटख्याची वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १२) दुपारी धावडेवस्ती, भोसरी येथे सामाजिक सुरक्षा विभागाने केली.
सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक जालिंदर गोरे यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परशुराम प्रदिप ढेपे (वय १९, रा. एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार चंद्रकांत ऊर्फ बंटी विश्वनाथ जगदाळे (वय २९, रा. शिवगणेश नगर, गुळवे वसाहत, भोसरी) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 328,272,273, 188, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावडेवस्ती परिसरात एक तरुण गुटखा विक्री करत असल्याची गोपिनिय माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून परशुराम ढेपे याला दुचाकीसह (एम एच 14/एफ पी 1550) ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीवर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पोत्याची तपासणी केली असता त्यात पोलिसांना ५८ हजार ६४० रुपये किमतीचा गुटखा मिळाला. पोलिसांनी गुटखा आणि ५० हजारांची दुचाकी असा एकूण १ लाख ८ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परशुराम याने विक्रीसाठी वाहतूक केली. तर आरोपी चंद्रकांत जगदाळे याने प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!