सासरच्या मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या,पतीसह ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुनावळे;वेगवेगळ्या कारणांवरून होत असलेल्या सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०११ ते सात जुलै २०२१ या कालावधीत पुनावळे येथे घडला.

किरण संदीप पाटील (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या आईने मंगळवारी (दि. १३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या गुन्हा अंतर्गत पती संदीप कांतीलाल पाटील (वय ४०), सासरे कांतीलाल झावरू पाटील (वय ५६) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी मयत किरण पाटील यांना तिच्या वर्णावरून आरोपींनी वारंवार हिणवून त्रास दिला. तसेच भागीदारीमध्ये घेतलेल्या घराच्या हक्क सोडपत्रावर सही करण्यास आणि जबरदस्तीने घटस्फोट देण्यासाठी मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून किरण यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सासरच्या चार जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.