आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या तरुणाला अटक,भोसरी पोलीसांची कामगिरी

भोसरी;तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे मंगळवारी दि. १३ दुपारी घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंप मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

अमरजा सचिन पालकर (वय २५, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.गणेश सुरेश लांडगे (वय २८, रा.इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या पेट्रोलपंप मालकाचे नाव आहे. तेजस सूर्यकांत तावरे (वय २३, रा. भोसरी, मूळ रा. लिंगी पिंपळगाव, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लांडगे याचा पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथील सदगुरुनगर येथे लक्ष्मी एनर्जी अॅण्ड फ्यूल पेट्रोल पंप आहे. या पंपावर मयत तेजस काम करत होता. पंपावर मयत तेजस याने पैशांची अफरातफर केली, असे म्हणून आरोपीने तेजस याला बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने त्याच्या ऑफिसमध्ये तेजसला मारहाण केली. तसेच त्याची दुचाकी व मोबाइल आरोपीने ठेवून घेतला. तसेच तुझ्या आईवडिलांना फोन करून सांगून पोलीस केस करतो, अशी धमकी आरोपीने दिली. तेजस याच्यावर आरोपीने दबाव टाकून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले.

तेजस याने राहत्या घरात गळफास घेतला.घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर भोसरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेजसला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.तेजसने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. मयत तेजस याची बहीण अमरजा पालकर यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी लांडगे याला अटक केली आहे.

पुढील तपास भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.