६२ वर्षाच्या वृद्धाशी जवळीक साधून लुबाडले १८ लाख,३४ वर्षांच्या महिलेवर खंडणी गुन्हा दाखल
पिंपरी;६२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला भावनिक करून त्यांच्याकडे घरखर्चासाठी पैशांची मागणी करुन जवळीक साधल्यावर ब्लॅकमेल करुन १८ लाख रुपये एका महिलेने लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेली ४ वर्षे हा प्रकार सुरु होता. शेवटी संत तुकारामनगर येथील या ज्येष्ठ नागरिकाने ई मेल करुन पोलिसांना याची माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी किवळे येथील विकासनगरमध्ये राहणार्या एका ३४ वर्षाच्या महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरती मनोज पांचाळ उर्फ मंगल प्रकाश वाल्मिकी (वय ३४, रा. विकासनगर, किवळे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत आयनुद्दीन वीजर पटेल (वय ६२, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी बुधवारी दि. १४ पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने संत तुकारामनगरमध्ये राहणार्या एका ज्येष्ठ नागरिकाला भावनिक करून वेळोवेळी घरखर्चासाठी पैशांची मागणी करुन आईचे पेन्शनचे पैसे आल्यावर परत करेन. तसेच नोकरी मिळाल्यानंतर परत करेन असे सांगितले. त्यातून तिने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधली. त्यानंतर त्यांच्याकडे जास्त रक्कमेची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपी महिलेने बदनामी करुन खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. ई मेल तसेच फोनवरुन वारंवार पैशांची मागणी केली. हा प्रकार गेले चार वर्षे चालू होता. या काळात या महिलेने फिर्यादीकडून तब्बल १८ लाख रुपये घेतले. तरीही बदनामी करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी ती करत असल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे ई मेलद्वारे तक्रार केली आहे. पिपंरी पोलिसांनी या महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!