गांजा विक्री करणारा टोळका गजाआड,८ लाखाचा मुद्देमाल जप्त,अमली पदार्थविरोधी पथकाची कामगिरी

हडपसर;अमली पदार्थविरोधी पथकाने पुणे -सासवड रस्त्यावरून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून ८ लाख रुपये किमतीचा ४० किलो ५११ ग्रॅम गांजा जप्त केला. आज, शनिवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

सचिन नरसिंग शिंदे (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार मनोज साळुखे यांना खबऱ्याकडून हडपसर परिसरात एका वॅगनार कारमधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील सातववाडी बस स्टॉप समोर आलेल्या वॅगनार कारची तपासणी केली असता या कारमध्ये त्यांना ४० किलो ५११ ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी या गांजासहित वॅगनार कार, रोख ४० हजार रुपये, एक मोबाईल फोन, असा एकूण १३ लाख २९ हजार रुपयांचा
मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने हा गांजा रामलिंग रोड शिरूर येथून एका महिलेकडून विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस कर्मचारी प्रवीण शिर्के, राहुल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, नितीन जाधव यांच्या पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.