देहू, आळंदी सह पिंपरी चिंचवड मध्ये पालखी मार्गावर उद्या एक दिवसाची जमावबंदी
पुणे;आषाढी यात्रेसाठी आजपासून पंढरपूर शहर आणि परिसरातील १० गावात संचारबंदीला सुरुवात केली आहे. यामुळं काल अनेक विठ्ठल भक्तांनी नामदेव पायरी येथे येऊन दर्शनासाठी गर्दी केली होती. आजपासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत एसटी आणि खाजगी बससेवा पूर्णपणे बंद असणार असून शहरात केवळ दूध, औषधे आणि पेट्रोल , गॅस एवढीच सेवा सुरु राहणार आहे. यामुळे नागरिकांनीही खरेदीसाठी गर्दी केली आहे.
आज, १८ जुलैपासून २५ जुलै पर्यंत पंढरपूर शहरात संचारबंदी असणार असून गोपाळपूर येथील संचारबंदी २४ तारखेला तर इतर ९ गावातील संचारबंदी २२ तारखेला संपणार आहे.
पालखी मार्गावर उद्या एक दिवसाची जमावबंदी
देहू, आळंदी सह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पालखी मार्गावर एक दिवसाची जमावबंदी असेल. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका १९ जुलैला एसटीने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. यावेळी भाविक दर्शनासाठी देहू, आळंदी सह पालखी मार्गावर गर्दी करण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या दिवशी जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने,डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, ऍम्ब्युलन्स सेवा यांना ह्या जमावबंदी मधून वगळण्यात आले आहे. तसेच देहूगाव, आळंदी मधील स्थानिक नागरिकांना ओळखपत्र दाखवून प्रवेश मिळणार आहे.
आषाढी एकादशी यंदाही कोरोनाच्या संकटात होत असताना केवळ १० मानाच्या पालखी सोहळ्यातील ४०० वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार असून इतर वारकऱ्यांनी प्रवेश करू नये यासाठी तब्बल ३ हजार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच बंदोबस्ताला आलेल्या पोलीस अधिकारी यांची कोविड तपासणी करूनच त्यांना बंदोबस्ताचे रिपोर्टींग करू दिले जात असल्याने एकही कोरोनाग्रस्त कर्मचारी बंदोबस्तात असणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे.
कालपासून बंदोबस्ताला आलेल्या २ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यावर केवळ ५ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. हे कर्मचारी सोलापूर , सांगली आणि पुणे भागातील असून त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात हलविण्यात आलेले आहे. या पोलिसांना यात्रा काळात कोरोनाची लागण होऊ नये यासाठी त्यांना कोरोना किट देण्यात आले आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!