राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक

मुंबई; मुंबई पोलिसांनी सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. राज कुंद्राला अटक झाल्यामुळे सध्या बॉलिवूड आणि उद्योग जगतामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. अश्लील व्हिडीओ शूट करण्याच्या रॅकेटमध्ये गहना वशिष्ठलाही अटक करण्यात आली होती. त्यामुळे आता चौकशीमध्ये अनेक धागेदोरे समोर येत आहे. याचीच झळ राज कुंद्रालाही बसलेली दिसत आहे.

फेब्रुवारीमध्ये ‘गंदी बात’मधील अभिनेत्री गहना वशिष्ठला वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील व्हिडीओ शूट करून वेबसाईटवर अपलोड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गहनासोबत आणखी अकरा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जवळपास तीन तास चौकशी केल्यानंतर क्राईम ब्रँचने रात्री 11 वाजता त्याला मुंबईत बेड्या ठोकल्या. त्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने आपल्यालाही वाईट अनुभव आल्याचं सांगितलं आहे.

अभिनेत्री चे आरोप

“मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता.

ऑगस्ट २०२० मध्ये मला एका वेब सीरीजमध्ये काम करण्याची ऑफर आली. मी होकार दिल्यावर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाईन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली. मला धक्का बसला, आणि मी नकार देत कॉल बंद केला, असा दावा अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने केला आहे.

या व्हिडीओ कॉलमध्ये तिघे जण होते. त्यापैकी एकाचा चेहरा झाकलेला होता, तर एक बहुतेक राज कुंद्रा होता. जर तो यात सहभागी असेल, त्याला अटक करुन या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही सागरिकाने केली आहे.

सविस्तर प्रकरण:

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

गहना वशिष्ठच्या अटकेनंतर रॅकेटचा पर्दाफाश

फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई क्राईम ब्रँचने अश्लील चित्रपटांसंदर्भात एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यात राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत आणि मॉडेल-अभिनेत्री गहना वशिष्ठ यांच्यासह अकरा जणांना अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान समोर आले की आंतरराष्ट्रीय स्तरावर गहना वशिष्ठ आणि उमेश कामत याला केनरिन प्रॉडक्शन हाऊसमधून अश्लील चित्रपट बनवण्याचे काम मिळत असे. मेलद्वारे तयार केलेल्या अश्लील फिल्म केनरिन प्रॉडक्शन हाऊसला पाठवल्या जात. अश्लील चित्रपट निर्मितीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पैसे थेट यांच्या बँक अकाऊंटमध्ये पाठवले जायचे. सोशल मीडिया अ‍ॅप हॉटस्पॉटवर हे अश्लील चित्रपट अपलोड केले जात होते.

यापूर्वी अटक केलेला आरोपी आणि राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याच्या चौकशीत सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे राज कुंद्राला सोमवारी समन्स बजावून बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्यालाही अटक करण्यात आली. याच प्रकरणातील तपासा दरम्यान गुन्हे शाखेला हेही समजले, की केनरिन प्रॉडक्शन हाऊस देशभरातील वेगवेगळ्या एजंट्सच्या मार्फत अश्लील सिनेमे पुरवण्याचा व्यवसाय करत आहे आणि त्यासाठी फंडिंग करत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.