चाकण:पूर्वी काम करत असलेल्या कामगारानेच केली कंपनीत चोरी,दोघांना अटक
चाकण;कंपनीच्या स्टोअर रूममध्ये चोरी करून २ लाख ३३ हजारांचे पितळ धातूचे कच्चे मटेरियल चोरून नेले. चोरी करणाऱ्या एका चोरट्याला आणि चोरीचा माल विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला महाळुगे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रसाद भारत पांडव (वय २२, रा.खालुम्ब्रे, ता.खेड. मूळ रा. वेरूळ, ता.खुलताबाद, जि. औरंगाबाद), सोनू साधू शर्मा (वय ३२, रा. नाणेकरवाडी. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. विशाल पवार, राहुल पवार (दोघे रा.शेगाव), मयूर (पूर्ण नाव नमुद नाही) अशी या फरारी ३ आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी मध्यरात्री दीड ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास कुरूळी येथील बंडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या स्टोअर रूम मधून पाच चोरट्यांनी दोन लाख ३३ हजार ८६८ रुपये किमतीचे पितळ धातूचे कच्चे मटेरियल चोरून नेले. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी कंपनीमध्ये पूर्वी काम करत असलेला कामगार विशाल पवार याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून केली असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामध्ये उघडकीस आली. पोलिसांनी विशाल पवार याचा साथीदार प्रसाद पांडव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने त्याच्या साथीदारांसोबत ही चोरी केल्याचे कबूल केले. तसेच चोरी केलेले साहित्य नाणेकरवाडी येथील भंगार व्यवसायिक सोनू शर्मा याला विकल्याचे प्रसाद याने सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी सोनू शर्मा याला अटक त्याच्याकडून दोन लाख ३३ हजार ८६८ रुपये किमतीचे पितळ धातूचे कच्चे मटेरियल हस्तगत केले. त्यांच्या तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!