खुनाच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार १३ वर्षांनी जेरबंद,पिंपरी-चिंचवड गुंडा विरोधी पथकाची कामगिरी
पिंपरी चिंचवड;खुनाच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीने तब्बल तेरा वर्षे आपली ओळख लपवून पोलिसांना गुंगारा दिला. दरम्यानच्या कालावधीत या आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःची खोटी ओळख निर्माण करून शासनाची आणि पोलिसांची फसवणूक केली.
याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हजरतअली पठाण यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुमंत उर्फ पिंट्या महादेव चव्हाण (वय ३८, रा. विद्यानगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, हा प्रकार २५ ऑगस्ट २००८ पासून १६ जुलै २०२१ या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हनुमंत चव्हाण याच्यावर २००८ साली खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरार असल्याने न्यायालयाने देखील त्याला फरारी घोषित केले होते. दरम्यानच्या कालावधीत आरोपी हनुमंत चव्हाण हा अटक टाळण्यासाठी अमित महादेव पाटील या बनावट नावाने सातारा, औरंगाबाद, पुणे इत्यादी शहरात राहत होता. सुरूवातीला आरोपीने बनावट नावाने दोन आधारकार्ड काढले. त्याआधारे सातारा आरटीओचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, बँक ऑफ बडोदाचे डेबिट कार्ड बनवून घेतले. या कागदपत्रांचा त्याने विविध शहरांमध्ये वारंवार वापर केला.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने त्याला खूनाच्या गुन्ह्यात अटक केली. त्याच्याकडे चौकशी करत असताना बनावट कागदपत्रे आढळून आली. त्यात त्याने बनावट नावाने वास्तव्य केल्याचे उघडकीस आले. याबाबत भारतीय दंड विधान कलम 420, 465, 467, 468 आणि 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!