हॉटेल ‘गारवा’ मुळे व्यवसाय होत नाही म्हणून रामदास आखाडे यांची हत्या,हॉटेल ‘अशोका’चे मालक खेडेकरकडून आखाडेंच्या खूनाची सुपारी; ८ जणांना अटक

पुणे; पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल गारवामुळे त्याच्या शेजारच्या अशोका हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे अशोका हॉटेलच्या चालकांनी एका सराईत गुन्हेगाराला सुपारी देवून हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. खून करण्यासाठी आरोपींना दररोज एक ते दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. उपचारादरम्यान हॉटेल चालकाचा मृत्यू झाल्याने हल्लेखोर आणि साथीदाराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५६), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय २४), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी (वय २१), अक्षय अविनाश दाभाडे (वय २७) करण विजय खडसे (वय २१), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय २३), गणेश मधुकर साने (वय २०) आणि निखिल मंगेश चौधरी (वय २०, सर्व रा. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यां आरोपींची नावे आहेत.

रामदास रघुनाथ आखाडे (वय ३८, रा. जावजी बुवाची वाडी, ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. बाळासाहेब खेडेकर व त्याचा मुलगा निखिल यांचे आखाडे यांच्या गारवा हॉटेल शेजारी अशोका नावाचे हॉटेल आहे. आखाडे यांच्या हॉटेलमुळे खेडेकर यांच्या हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे बाळासाहेब खेडेकर याने त्याचा भाचा सौरभ चौधरी याला आखाडे याचा खून करण्यास सांगितले. आखाडे यांचा खून केल्यास तुला दररोज एक ते दोन हजार रुपये देवू असे खुनाच्या दोन महिने आधी खेडेकर बाप-लेकाने चौधरी याला सांगितले होते. त्यानुसार चौधरी याने त्याचा साथीदार नीलेश मधुकर आरते व इतर साथीदारांच्या मदतीने आखाडे यांचा खून केल्याची माहिती गुरुवारी सरकारी वकील संजय दिक्षीत यांनी न्यायालयास दिली.

सविस्तर प्रकरण:

आखाडे यांचे सोलापूर रस्त्यावरील उरुळी कांचन परिसरात गारवा नावाचे हॉटेल आहे. रविवारी ता.१८ ते सायंकाळी पावणेसातच्या सुमारास उपाहारगृहासमोर खुर्ची टाकून बसले होते. त्या वेळी हल्लेखोर आणि त्याच्याबरोबर असलेला साथीदार दुचाकीवरून तेथे आले. काही कळायच्या आत एका हल्लेखोराने त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.

सोलापूर रस्त्यावर अशोका व गारवा हे दोन्ही हॉटेल शेजारी-शेजारी आहे. गारवाचा रोजचा व्यवसाय हा दोन ते अडीच लाख रुपये तर अशोकाचा व्यवसाय साधारण ५० ते ६० हजार रुपये होते. ज्या-ज्या वेळी हॉटेल गारवा काही निमित्ताने बंद असते त्या-त्या वेळी अशोकाचा व्यवसाय अडीच ते तीन लाख रुपयांचा होता. त्यामुळे गारवा हॉटेल कायमचे बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल या विचाराने आरोपींनी खुनाचा कट केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दादाराजे पवार या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.