अट्टल गुंड सूरज गायकवाड टोळीवर मोक्का,पीसीबी गुन्हे शाखेची कामगिरी

भोसरी;एमआयडीसी भोसरी परिसरातील सराईत गुंड सूरज गायकवाड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी दि.२३ आदेश दिले आहेत.

टोळी प्रमुख सूरज ऊर्फ डिप्शा महादेव गायकवाड (वय २१, रा. लकी स्क्रॅप सेंटर मागे, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे), जावेद लालसाहब नदाफ (वय २२, रा. नाल्याजवळ, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी,पुणे), अजय बाळू ससाणे (वय २२, रा. मस्जिद जवळ, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे), ओंकार ऊर्फ आण्णा बाळू हजारे (वय २५, रा. वेताळनगर, चिंचवड, पुणे) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर दुखापत, जबरी चोरी, विनयभंग, जबर दुखापत, बेकायदा जमाव जमवून दरोडा घालणे, खंडणी उकळण्यासाठी गंभीर दुखापत करणे, खूनाचा प्रयत्न करणे व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे एकूण १२ गुन्हे एमआयडीसी भोसरी, भोसरी व चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ही टोळी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत होती. या टोळीवर कारवाई करण्याचा प्रस्ताव एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अपर पोलीस आयुक्तांकडे पीसीबी गुन्हे शाखेमार्फत पाठवला. त्याबाबत अपर आयुक्तांनी मोक्काची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.