गाडीला धडक देण्याबाबत जाब विचारल्यावर दुचाकीस्वाराला बेदम मारहाण,४ टोळक्यांवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड;दुचाकीला पाठीमागून धडक देऊन दुचाकीचे नुकसान केले. याबाबत दुचाकीस्वाराने जाब विचारला. त्यावरून चार जणांनी मिळून दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना संत तुकाराम नगर, पिंपरी येथे शनी मंदिर चौकात घडली.

याप्रकरणी आयुष अमित कांबळे (वय १८, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश अजित कांबळे (वय १९), अर्षद सलीम शेख (वय १९, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), लक्ष्मण कैलास वाघमारे (वय १९, रा. लालटोपीनगर, पिंपरी), राकेश राम गंजेळी (वय १९, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे त्यांच्या दुचाकीवरून संत तुकाराम नगर येथील शनिमंदिर चौकातून जात होते. त्यावेळी आरोपींनी पाठीमागून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये कांबळे यांच्या दुचाकीची नंबर प्लेट तुटली. त्यामुळे कांबळे यांनी आरोपींना ‘तुम्हाला गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का’, असे विचारले. या कारणावरून आरोपींनी कांबळे यांना शिवीगाळ करत हाताने आणि लहान मुलांच्या खेळण्याच्या सायकलने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर कांबळे यांनी ‘तुमची पोलिसात तक्रार देतो’, असे म्हटले. या कारणावरून आरोप राकेश याने लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

पुढील कारवाई पिंपरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.