पुण्यातील महिला डीसीपीचा फुकटेपणा उघड, ऑडिओ क्लिप होतेय प्रचंड व्हायरल

पुणे : पुणे हे असं शहर आहे, जे तिथल्या हटके नियमांमुळे नेहमीच चर्चेत असतं. म्हणूनच पुणे तिथे काय उणे, असं म्हटले जाते. सध्या सोशल मीडियावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमला फुकट बिर्याणी हवी असल्याचा ऑडिओ आणि त्यांची ही फर्माईश सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतेय. डीसीपी मॅडमच्या या प्रकाराला कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र देखील लिहिल्याचं कळतंय. दरम्यान, आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत.

 

अशी आहे व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप

साधारण ५ मिनिटांची ही ऑडिओ क्लिप आहे. यामध्ये डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगतात. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा आग्रह आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबत नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही विचारलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचे सांगतोय. अशावेळी मॅडम त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी खडसावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे.

 

कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांचं पोलीस महासंचालकांना पत्र

असेही समोर आले की, समाजकल्याण आयुक्त पदावर असलेल्या मॅडमच्या पतीला मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलीस निरीक्षकाकडे तक्रार करा, असेही त्या आपल्या कर्मचाऱ्याला सांगायला विसरत नाहीत. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. भ्रष्टाचार वाढवणाऱ्या या अधिकारी महिलेची खाबुगिरी रोखण्याची आणि चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.