हृदयद्रावक! 16 कोटींचे इंजेक्शन दिल्यानंतरही भोसरीतील चिमुकल्या वेदिका शिंदेच निधन

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड मधील भोसरी येथील 11 महिन्यांच्या वेदिका सौरभ शिंदे या चिमुरडीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. वेदिकाला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप-वन हा दुर्मिळ आजार झाला होता. त्यावरील उपचारासाठी तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात ‘झोलगेन्स्मा’ हे 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन  दीड महिन्यांपूर्वी दिले होते. पण रविवारी मात्र ही दुःखद बातमी आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये.

फेब्रुवारी महिन्यात वेदिकाच्या शरीरातील हालचाली या नैसर्गिकरित्या होत नसल्याचं दिसून आलं होतं. म्हणून तिच्या आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा या लहान चिमुरडीला दीर्घायुष्य हवं असेल तर तब्बल 16 कोटी रुपयांची लस द्यावी लागणार असल्याचं समजलं. कारण ह्या आजारामध्ये खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. शिवाय जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो.

पण वेदिकाच्या आई-वडिलांनी हार मानली नाही. 16 कोटी रुपयांसाठी त्यांनी समाजाकडे मदतीची हाक दिली. बघता-बघता पैसे जमा होऊ लागले. आई-वडिलांनी महाराष्ट्र पिंजून प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर जून महिन्यात 16 कोटी उभे राहिले. अमेरिकेतून इंजेक्शन मागविले होते. त्यावरील सहा कोटी रुपयांचे आयात शुल्क केंद्र सरकारने माफ केले होते. पंधरा जून रोजी वेदिकाला इंजेक्शन दिले होते. तेव्हा पासून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.

31 जुलैला त्यात पुन्हा सुधारणा झाली, रविवारी दुपारपर्यंत देखील ती चांगला प्रतिसाद देत होती. फेसबुकवर तिच्या नावाने असलेल्या पेजवर तिचे व्हिडीओ पोस्ट करत तशी माहितीही देण्यात आली. तिचे वडील सौरभ शिंदेंनी फेसबुकवर स्टेटस ठेवत हितचिंतकांना कळवलं. पण त्यानंतर रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, सहाच्या सुमारास तिचे निधन झाले. गेली सहा महिने तिच्या जगण्याचा संघर्ष सुरू होता, पण रविवारी मात्र तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. ही दुःखद बातमी येताच देशात हळहळ व्यक्त केली जातीये.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.