जीवधन किल्ल्यावरून उतरत असताना दिल्लीच्या तरुणीचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू

 जुन्नर :  कोरोनामुळे पर्यटनास बंदी असतानाही भर पावसात पावसाळी पर्यटनासाठी भटकंती करत असताना मित्रांसोबत किल्यावर गेलेल्या तरुणीच्या मृत्यूचं वृत्त समोर आलं आहे. भर पावसात पर्यटनासाठी भटकंती करत असताना मित्रांसोबत किल्ल्यावर गेलेली तरुणी खाली उतरत असताना तिचा पाय घसरला. त्यामुळे ती खोल दरीत  कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुणे  जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नाणेघाट जवळील जीवधन किल्ल्यावर घडली. ही तरुणी मुळची नवी दिल्ली येथील असून ही घटना बुधवारी (दि. 4) घडली.

जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचिका सेठ  (वय-30 रा. नवी दिल्ली) असे या तरुणीचे नाव आहे.रुचिका 31 जुलै रोजी दिल्लीहून ठाणे येथील ओमकार बाईत यांचेकडे आली होती. ते दोघे ३ ऑगस्ट रोजी मोटार सायकलवरून कल्याण येथे आले. यानंतर डोंबिवली पूर्व येथील दिनेश रामकरण यादव व मंजू दिनेश यादव यांच्या समवेत मोटारसायकल वरून चौघेही माळशेज घाट मार्गे नाणेघाट येथे आले. येथे त्यांनी रात्री मुक्काम केला. सकाळी चौघे जीवधन किल्ला पहाण्यासाठी गेले होते. किल्ला पाहून परत येत असताना ही दुर्घटना घडली. जखमी रुचिकास जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यावेळी ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

जीवधन किल्ल्यावरून घसरून पडल्याने जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, मृत झाल्याची ही पहिलीच घटना आहे. पर्यटनास बंदी असताना देखिल नाणेघाट परिसरात पावसाळी पर्यटनास येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पोलिसांच्या दंडात्मक कारवाईची भीती बाळगली जात नाही. मागील आठवड्यात तर पोलिसांना अरेरावीची भाषा वापरून कारवाईत अडथळा आणल्याचा आरोपावरून पुणे येथील अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाची जोखीम घेऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.