Tokyo Olympics 2020: चंक दे इंडिया; भारतीय हॉकी टीमने रचला इतिहास, 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक

मुंबई : Tokyo Men’s Hockey Match : भारतीय हॉकी संघानं इतिहास रचत आक्रमक जर्मनीवर मात करत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केला आहे. तब्बल 41 वर्षांनी भारतीय पुरुष संघानं धमाकेदार खेळी करत ऑलिम्पिक पदक पटकावलं आहे. अटी-तटीच्या सामन्यात भारतानं जर्मनीचा 5-4 अशा फरकानं पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. सामना सुरु झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच पहिला गोल डागत जर्मनीनं आघाडी घेतली होती. पण, भारतानं आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं. भारताचा गोलकिपर श्रीजेशनं उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. श्रीजेशच्या अभेद्य भिंतीमुळेच भारताचा विजय सोपा झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

 

भारताने 1980 साली पहिल्यांदा हॉकीमध्ये पदक मिळवले होते यानंतर आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्य पदक मिळवले आहे. भारताने शानदार खेळी करत 5:4 ने जर्मनीचा पराभव केला आहे. जर्मनीविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय टीमने संघात कोणताही बदल केला नव्हता. मात्र आपल्या उत्तम खेळीने भारताला पदक मिळवून दिलं आहे.

भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील 41 वर्षापासूनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला. कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा पराभव करून देशाला ऐतिहासिक असा विजय मिळवला. याआधी भारताने ऑलिम्पिकमध्ये 1980 साली अखेरचे पदक जिंकले होते. तेव्हा मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताने पुन्हा एकदा हॉकीतील सुवर्णयुगाची सुरुवात केली आहे.

पाच ऑगस्ट रोजी झालेल्या कास्य पदकाच्या लढतीत जर्मनीने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून धडाकेबाज सुरूवात केली. पहिल्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा जर्मनीकडे 1-0 अशी आघाडी होती. या क्वॉर्टरच्या अखेरच्या काही मिनिटात जर्मनीला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारताने त्यांना गोल करू दिली नाही. जर्मनीने दुसऱ्याच मिनिटाला गोल केल्याने भारताची बचाव फळी अलर्ट झाली.

दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने सुरुवातीच्या काही मिनिटात गोल करून १-१ अशी बरोबरी केली. पण जर्मनीने एकापाठोपाठ एक गोल करून 3-1 अशी मोठी आघाडी घेतली. भारत ही लढत गमवतोय की काय असे वाटत असताना पहिला हाफ संपण्याच्या आधी भारताने गोलचा धडाका लावला आणि 3-3 अशी बरोबरी केली.

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये सुरुवातीलाच रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने भारतासाठी आणखी एक गोल करून 5-3 अशी आघाडी केली. तिसऱ्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा भारताने आघाडी कायम ठेवली होती.

चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला जर्मनी काहीशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जर्मनीनं चौथा गोल डागत सामना 5-4 अशा उत्कंठावर्धक वळणावर आणला. पण वेळ संपली आणि जर्मनीचं कांस्य पदका मिळवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.

यापूर्वी भारताच्या वासुदेवन भास्करनच्या नेतृत्त्वात 1980 मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये भारतानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. आजच्या पदाकासोबतच ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताच्या पदकांची संख्या 12 झाली आहे. यापैकी 8 सुवर्णपदकं, एक रौप्यपदक आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. असा विक्रम करणारा भारतीय हॉकी संघ जगभरातील एकमेव संघ आहे.

हॉकीमध्ये भारताना आपलं शेवटचं पदक 1980 मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं. त्यावेळी वासुदेवन भास्करन कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्त्वात भारतानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत भारताचं सर्वात चांगलं प्रदर्शन 1984 च्या लॉस अॅजलोसमध्ये होतं. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ पाचव्या स्थानावर होता. आजच्या विजयानंतर तब्बल 41 वर्षांनी भारतानं ऑलिम्पिक हॉकीमधील पदकांचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.