ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला मोठं यश ; ‘आर्मी मॅन’ नीरज चोप्राला गोल्ड

 

Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष भालाफेक गटात इंडियन आर्मी मॅन नीरज चोप्रानं इतिहास रचलाय. पात्रता फेरीतील कामगिरीत आणखी सुधारणा करत त्याने यंदाच्या स्पर्धेत तमाम भारतीयांना सोनेरी क्षणाची अनुभूती देणारी कामगिरी केली. नीरज चोप्राने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करत सर्वात लांब भाला फेकत त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले आणि आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे गोल्ड मिळवून दिलय. यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे एकमेव सुवर्ण पदक आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत सात पदके जिंकली आहेत.

नीरज चोप्रा आणि जर्मनीचा जोहान्स वेट्टर यांच्यात चुरस पाहायला मिळेल असे वाटत होते. पण जर्मनीच्या खेळाडूसह अन्य कोणत्याही खेळाडूला त्याच्या जवळपासही भाला फेकता आला नाही. 2008 मध्ये अभिनव बिंद्राने शूटिंगमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. त्यानंतर भारताला वैयक्तिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय.

नीरजसह 12 स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), ॲम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते

पात्रता फेरीत टॉपर राहिलेल्या नीरज चोप्राने फायनल इवेंटमध्ये पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर भाला फेकला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी जोर लावत 87.58 मीटर भाला फेकून प्रतिस्पर्धांना आणखी मागे टाकले. तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला. नीरजचा चौथा आणि पाचवा प्रयत्न फाऊल झाला.

2016 मध्ये ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरजने लक्षवेधी कामगिरी नोंदवली होती. 20 वर्षांखालील स्पर्धेत त्याने 84.48 मीटर भाला फेकला होता. ज्यूनिअर वर्गवारीतील त्याचा हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे. त्यामुळेच त्याच्याकडून पदकाची आस होती. त्याने हा विश्वविक्रम रिओ ऑलिम्पिक कॉलिफिकेशनच्या शेवटच्या दिवशी नोंदवला होता. त्यामुळे मागील ऑलिम्पिकमध्ये तो ऑलिम्पिक खेळताना दिसला नव्हता. पण यंदा तो मैदानात उतरला आणि त्याने सुवर्ण स्वप्नपूर्ती साकार केली.

नीरज चोप्राच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरला असून याआधी कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.