लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या बार मालकांची अनोखी शक्कल, चक्क रिसॉर्टमध्ये सुरू केला डान्सबार!, 15 मुली ताब्यात

 

वसई : लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या बार मालकांनी अनोखी शक्कल लढवून पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क वसईतील एका रिसॉर्टमध्येच डान्सबार तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी चांदीप येथील मॉस नावाच्या रिसॉर्टवर रात्री छापा टाकून १५ मुलींसह, ग्राहक आणि हॉटेलच्या कर्मचार्‍यांना अटक केली आहे.रिसॉर्टमध्ये अशाप्रकारे डान्सबार सुरू करण्याची ही पहिलीच घटना आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यातील ऑर्केस्ट्रा बार बंद झाले आहेत. त्यामुळे डान्सबार मालकाने अनोखी शक्कल लढवत रिसॉर्टमध्येच डान्स बार सुरू करण्याचे ठरवले. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चांदीप गावाजवळ असलेल्या मॉस या रिसॉर्टमध्ये हा डान्स बार सुरू करण्यात आला होता. गेल्या ३-४ दिवसांपासून हा रिसॉर्टमधला डान्स बार छुप्या पध्दतीने सुरू होता आणि त्यात मोठ्याप्रमाणावर ग्राहक येत होते. याची कुणकूण विरार पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी रात्री सापळा लावून कारवाई केली.या कारवाईत एकूण २१ जणांना ताब्यात घेण्यात आले.त्यात १५ बारबाला, ६ ग्राहक आणि हॉटेलचा व्यवस्थापक आणि कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

काशिमिरा येथील बॉसी नावाच्या डान्सबार मालक सचिन दांडगे याने हा बार सुरू केल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रफु्ल्ल वाघ यांनी दिली. अटक केलेल्या आरोपींना दुपारी वसईच्या मे.सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्यावर विविध कलमांसह आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी रिसॉर्ट मालकावरही गुन्हे दाखल केले, असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रिसॉर्टमध्ये अशाप्रकारे डान्सबार सुरू असल्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.