“कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करता येणार”, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार राज्यावर कायम आहे. त्यामुळे कोरोना थोपवायचा असेल तर नियम पाळावेच लागणार आहे. मात्र, राज्याचं आर्थिक चक्रही चालणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात, शहरात कोरोना कमी झाला आहे, अशा ठिकाणी निर्बंध शिथिल करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोबतच 15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

लोकलसेवा स्वातंत्र्यादिनापासून सुरु

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल.ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.

महापूरात प्रशासनाचं काम कौतुकास्पद

यावर्षीही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आली. मात्र, अशाही परिस्थितीत आपल्या बचाव पथकाने जवळपास साडेचार लाख नागरिकांचे स्थलांतर केले. दरड कोसळून गावेच्या गावं भूईसपाट झाली आहेत. देशात दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं आहे. मागे सिक्कीमचे मुख्यमंत्री मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनीही मला सांगितले की आमच्याकडेही दरड कोसळण्याचं प्रमाण वाढलं आहे. याला अनेक कारणं आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचेही हे परिणाम दिसत आहेत. यामुळे यावर कायमस्वरुपी उपाय शोधला पाहिजे.

मी स्वतः त्याठिकाणी जाऊन आढावा घेतला. त्यावेळीच मी सांगितलं की मी पॅकेज तत्काळ जाहीर करणार नसलो तरी कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. त्याचप्रमाणे आपण साडेअकरा कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. अशा आपत्ती आपल्यानंतर चौकशी केली जाते, अहवाल येतात. मात्र, याची अंमलबजावणी होत नव्हती. मात्र, आता असे होणार नाही. यापूर्वीच्याही अहवालाच्या सूचनाही आम्ही पाळणार आहोत. यावर आता दूरगामी विचार करुन कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींना भेटलो होतो. यावेळी एनडीआरएफच्या नियमांत बदल करण्याची विनंती केली होती. कारण, एनडीआरएफचे मदत करण्याची नियम आता जुने झाले आहेत.

कार्यालयीन कामाच्या वेळेच विभागणी करा

उद्धव ठाकरे यांनी कार्यालयीन कामाच्या वेळांची विभागणी करण्याचं आवाहन उद्योजकांना केलंय. त्यांनी म्हटलंय की, गर्दी करु नका. त्यासाठी कार्यालयीन कामाच्या वेळेची विभागणी करायला हवी. ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्यय ते करतील. उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय करायला हवी. परत लॉकडाऊन लावायची वेळ आलीच तर कर्मचाऱ्यांना गावी जावं लागणार नाही. यासाठीचं नियोजन आतापासूनच करा, अशाही त्यांनी सूचना दिल्या आहेत.

सविस्तर निर्बंध बैठकीनंतर

उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, सणासुदीचे दिवस पुढे आहेत, संकट संपलेलं नाहीये. उद्या टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतर निर्बंधांबाबतचा विस्तारितपणे निर्णय कळवला जाईल. दोन डोस घेऊन १५ दिवस झालेल्यांना निर्बंधात शिथिलता देण्याचा विचार आहे. स्वातंत्र्यदिनाला शपथ घ्या की, आम्ही कोरोनामुक्त होऊ. त्यावेळी लोकमान्यांच्या ‘स्वराज्य’ घोषणेप्रमाणेच कोरोनापासून मुक्तीची प्रतिज्ञा करा, असंही त्यांनी म्हटलंय. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुकही केलंय. त्यांनी म्हटलंय की, जनता सरकार सांगेल ते ऐकत आहे, म्हणून जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं कौतुक होतंय. हे श्रेय जनतेचं आहे, माझं नाही. मी निमित्तमात्र आहे कौतुकासाठी, मात्र जनतेचं हे श्रेय आहे.

तिसरी लाट आलीच तर…

कोरोना गेला असं वाटत असताना कोरोना पुन्हा उद्भवतो त्यामुळे संयम बाळगा. तिसरी लाट येईल असं गृहीत धरुनच आधीपासूनच कोटकोर नियोजन करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, गेल्यावेळी सतराशे मेट्रीक टन ऑक्सिजन लागत होता. म्हणून आपण आता काही शिथिलता आणत असताना तिसरी लाट आलीच तर रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन आपण ऑक्सिजनचा पुरवठेचं गणित घालू आणि त्यानुसार लॉकडाऊनचं नियोजन करु. तसेच बऱ्याच सरपंचांनी आपलं गाव कोरोनामुक्त होण्याच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केलीये. सध्या लसीकरणाचा वेग वाढतोय. दोन डोस घेतलेले आणि एक डोस घेतलेल्यांची वर्गीकरण करुन आपल्या निर्बंध ठरवावे लागतील

नियम पाळावेच लागतील…

ठाकरे म्हणाले की, कोरोना आहे. आता एकेक सण येतील. गेल्यावर्षी सणांनंतरच दुसरी लाट आपण अनुभवली. त्यामुळे आपण अनुभवातून आपण शिकलोय की, कोविड थोपवायचा असेल तर नियम पाळावे लागतील. लसीकरणाची गती वाढवलीय. पण जोपर्यंत लसीकरण एका ठराविक टक्क्यांपर्यंत होत नाही, तोवर आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील.

तर केंद्र सरकारनं आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा दूर करावी अशी मागणी

तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापत चाललं आहे. विरोधी पक्षासह अनेक मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. अशावेळी केंद्र सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेत 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारांना मिळणार आहे. मात्र, फक्त राज्यांना अधिकार देऊन फायदा होणार नाही. तर केंद्र सरकारनं आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा दूर करावी अशी मागणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.

इम्पिरिकल डेटाची मागणी आपण केंद्राकडे केली होती

मधल्या काळात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी नैसर्गिक आपत्तीच्या काळात एनडीआरएफकडून केल्या जाणाऱ्या मदतीच्या निकषात बदल करण्याची मागमी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटाची मागणी आपण केंद्राकडे केली होती. तसंच मराठा समाजाबाबत आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला देण्याची मागणी आपण मोदींकडे केली होती. तसंच आरक्षणाची 50 टक्क्यांची अट रद्द करण्याची मागणीही आपण केली होती. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यावर आता लोकसभेत चर्चा होईल. मात्र, फक्त अधिकार देऊन फायदा होणार नाही. तर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढावी लागेल. तशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. मला विश्वास आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ही अटही काढतील. याबाबत दोन चार दिवसांत आपल्याला कळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.