‘एम्पॉवर’ संस्थेच्या सहकार्यातून ‘संवेदना’ प्रकल्प – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : ग्रामीण भागातील मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष देणे ही काळाची गरज असून आरोग्य विभागाच्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपचारासोबतच जाणीवजागृतीवर भर दिला जाणार आहे. त्यासाठी ‘एम्पॉवर’ संस्थेच्या सहकार्यातून जालना जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एम्पॉवर या मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमार्फत ग्रामीण मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात जाणीवजागृती, प्रशिक्षण आणि उपचारासाठीचा प्रायोगिक तत्वावर ‘संवेदना’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमास एम्पॉवर संस्थेच्या अध्यक्ष नीरजा बिर्ला, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, सहसंचालक डॉ.पद्मजा जोगेवार, जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, एम्पॉवर संस्थेच्या डॉ.अपर्णा मेथील आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री टोपे यावेळी म्हणाले, बदलती जीवनशैली, स्पर्धात्मक युग यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. कोरोनामुळे तर मानसिक आरोग्याचे मोठे आव्हानच उभे ठाकले आहे. शहरी भागात मानसिक आजाराबाबत काहीशी जागरूकता आढळून येते मात्र ग्रामीण भागात त्याविषयी अधिक जाणीवजागृती कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागामार्फत राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविला जात आहे. त्याला बळकटी देण्यासाठी एम्पॉवर सारख्या संस्थांची मदत होणार आहे. मानसिक आरोग्यावर भर देतानाच मानसोपचार तज्ञांची आणि मानसोपचार शास्त्रज्ञांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

एम्पॉवर संस्थेच्या श्रीमती बिर्ला म्हणाल्या, एम्पॉवर संस्था मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मानिसक आरोग्याविषयी विशेषत: ग्रामीण भागात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी संस्थेमार्फत जाणीवजागृती उपक्रम, आरोग्य यंत्रणेची क्षमता बांधणी, तज्ञांकडून प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जालना जिल्ह्यातील प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर संपूर्ण राज्यभर हा प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्त ‘संवेदना’ प्रकल्पाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. आरोग्य संचालक डॉ. तायडे, डॉ. मेथील यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे डॉ. अंबरीश धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भोसले यांनी आभार मानले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.