पिंपरीत खोदकाम करताना सापडला ब्रिटिशकालीन ‘बॉम्ब’
पिंपरी चिंचवड : पिंपरीमध्ये ब्रिटिशकालीन ‘बॉम्ब’ (bomb) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज (सोमवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरीत उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील क्रोमा सेंटर जवळ बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली आहे. क्रोमाच्या पाठीमागे असलेल्या कोहिनूर सोसायटी जवळ मोकळी जागा असून तिथे अतिक्रमण झाले होते. सोमवारी सकाळी अतिक्रमण काढण्यात आले. त्यावेळी बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी त्यांच्या ओळखीतील जाणकारांना व्हिडीओ कॉलवरून माहिती दिली. त्यावेळी जाणकारांनी ही वास्तू ब्रिटिशकालीन बॉम्ब असून त्याच्या जवळ न जाण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. याची माहिती पिंपरी पोलिसांनी मिळताच पिंपरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बॉम्ब शोधक नाशक पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर जेसीबीच्या बकेटमध्ये वाळूची पोती टाकून त्यात बॉम्ब सदृश वस्तू ठेऊन पुढील तपासणीसाठी नेण्यात आली आहे.
यापूर्वी देखील अशा प्रकारचे ब्रिटिशकालीन बॉम्ब पिंपरी परिसरात सापडले आहेत. हे बॉम्ब अनेक वर्षांपासून जमिनीवर पडलेले असून ते खोदकामाच्या वेळी उघडकीस येत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!