अभ्यासावरुन रागवणाऱ्या आईची अल्पवयीन मुलीकडून कराटे बेल्टने गळा आवळून हत्या, नंतर मामाला पाठवला मेसेज; आत्महत्या केल्याचा रचला बनाव

नवी मुंबई : अभ्यासावरुन रागावणाऱ्या स्वत:च्या आईची 15 वर्षीय मुलीने कराटेच्या कापडी पट्टयाने गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आईने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यासाठी या अल्पवयीन मुलीने मामाला आईच्या मोबाईलवरुन मेसेच पाठवला. ही घटना ऐरोलीत 30 जुलै रोजी घडली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या मुलीने हत्या केल्याची कबुली दिली. शिल्पा जाधव (वय 41) असे  खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिल्पा ही पती संतोष जाधव  आणि 15 वर्षीय मुलगी तसेच 6 वर्षाचा मुलगा यांच्यासह रहात होती. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे अशी शिल्पा जाधव आणि संतोष जाधव या दोघांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी तिला गत मे महिन्यापासून नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावून दिला होता. या परीक्षेच्या अभ्यासामध्ये मुलीने सातत्य ठेवावे यासाठी आई शिल्पा जाधव कायम आपल्या मुलीवर दबाव आणत होती. त्यामुळे मुलीचे आपल्या आईसोबत अभ्यासावरुन नेहमी भांडण होत होते. 27 जुलै रोजी मुलीने मोबाईल घेतल्याने वडिलांकडून तिला ओरडा मिळाला होता. त्यामुळे ती रागावून जवळच राहणारे मामा शैलेश पवार याच्या घरी गेली होती.

त्यानंतर सायंकाळी आई आपल्या मुलीची समजूत काढण्यासाठी भावाच्या घरी गेली असताना, मुलीचे आपल्या आईसोबत पुन्हा वाद झाला. या वादात मुलीने आई वडिलांविरोधात पोलिसात तक्रार करण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे आईने मुलीला रबाळे पोलीस ठाण्यात नेले होते. त्यावेळी रबाळे पोलिसांनी मुलीची आणि तिच्या आई-वडिलांची समजूत काढून त्यांना घरी पाठवुन दिले होते. त्यानंतर गत 30 जुलै रोजी सकाळी या मुलीचे वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घरामध्ये ती आई आणि लहान भावासह होती. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आईने पुन्हा आपल्या मुलीला अभ्यासावरुन रागावून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मुलीला मारहाण करताना आईने हातात सुरी घेतल्याने मुलीला आपल्या आईचा राग आला. त्यामुळे तिने आईचा जोरदार प्रतिकार केला. यावेळी आई आणि मुलगी या दोघींमध्ये झालेल्या झटापटीत आईने मुलीच्या डाव्या हाताच्या तळव्याला चावा घेतल्याने मुलीने आईला ढकलून दिले. त्यामुळे आई खाली पडून तिच्या डोक्याला बेडरुममध्ये असलेल्या कॉटचा कोपरा लागला. त्यामुळे आई अर्धमेली होऊन पडल्यानंतर देखील तिने बेडवर पडलेला कराटेचा कापडी बेल्ट हातात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलीनेच तो बेल्ट आपल्या हातात घेऊन आईच्या गळ्याभोवती घट्ट आवळून धरत तिची हालचाल बंद होईपर्यत तसाच धरुन ठेवला. आई मेल्याची खात्री झाल्यानंतर तिने आईला सोडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आईची हत्या केल्यानंतर सदरचा प्रकार आत्महत्येचा वाटावा यासाठी मुलीने प्रथम बेडरुमच्या दरवाजाला बाहेरुन असलेली चावी काढून ती आईच्या बेडरुममध्ये ठेवली. त्यानंतर तिने आईचा मोबाईल घेऊन तिच्या व्हॉटस्अॅपवरुन वडील, मामा, मावशी यांच्या मोबाईलवर मी सर्व प्रयत्न केले, मी आपले आयुष्य संपवित आहे. अशा प्रकारचा इंग्रजीत मेसेज पाठवून बेडरुमचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर या मुलीने आपल्या वडिलांना फोन करुन आई बेडरुमचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे वडिलांनी जवळच राहणारा आपला मेव्हणा शैलेश पवार याला सांगितल्यानंतर त्याने तत्काळ बहिणीच्या घरी धाव घेऊन बेडरुमचा दरवाजा तोडल्यानंतर बेडरुममध्ये त्याला बहिण मृतावस्थेत पडल्याचे आणि तिच्या गळ्याभोवती कराटेचा कापडी पट्टा आवळल्याचे निदर्शनास आले.

सदर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शैला जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनात शैला जाधव यांचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि गळा आवळल्यामुळे झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तपास करण्यासाठी मृत शैला जाधव यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केली. या चौकशीत पोलिसांनी मुलीला विश्वासत घेऊन तिच्याकडे याबाबत विचारपूस केली असता, तिनेच आईची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर रबाले पोलिसांनी स्वतः या प्रकरणात फिर्यादी होऊन मुलीवर हत्या आणि पुराव नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.