कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या पूर्वतयारीचा आरोग्यमंत्री व अन्न,औषध प्रशासन मंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा आज आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मंत्रालयात झालेल्या संयुक्त बैठकीत घेतला. राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट महिनभरात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे त्याच बरोबर ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता वाढविण्याच्या सूचना यावेळी मंत्रीद्वयांनी दिल्या.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सुरू असलेल्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीस अन्न व औषध विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, आयुक्त परिमल सिंग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाई, आरोग्य विभागाचे सहआयुक्त डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.

ऑक्सिजनची उपलब्धता, उत्पादन, साठवणूक, वितरण याबाबत चर्चा करण्यात आली. राज्यात सध्या सुमारे २००० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे ३५० पीएसए प्लांट असून त्यातील १४१ पूर्ण क्षमतेने कार्यरत असून उर्वरित येत्या महिन्याभरात कार्यान्वित करण्याचे निर्देश दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील ५० खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पीएसए प्लांट बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील किती खासगी रुग्णालयांनी प्लांट बसविले आहेत याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी द्यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्धतेची क्षमता कळू शकेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ऑक्सिजन प्लांट मधून गळती होऊ नये यासाठी उत्पादकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.