मुंबई प्रमाणेच पुण्यात 2 डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवासास परवानगी
पुणे : राज्य सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांना निर्बंधातून सूट दिली आहे. तसेच, 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल ट्रेन देखील सामान्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे – लोणावळा लोकल आणि पुणे – दौंड डेमू प्रवासासाठी सामान्यांना परवानगी दिली जाणार आहे. मात्र, त्यांसाठी प्रवाशांचे दोन डोस झाले पाहिजेत आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी व्हायला हवा. यासाठी प्रवाशांना आवश्यक असणारा फोटोपास पोलीस प्रशासनकडून दिला जाणार आहे. लवकरच याबाबतची कार्यवाही सुरू होईल.
सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासास परवानगी द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. ती या निमित्ताने पूर्ण होत आहे. पुणे – लोणावळा लोकलच्या दिवसातून 4 फेऱ्या होत आहे. तर पुणे – दौंड दरम्यान देखील दिवसातून 4 फेऱ्या होत आहे. सध्या तरी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबाबत रेल्वेने कोणताही विचार केला नाही. दरम्यान, याबाबत अद्याप कोणाकडूनही फेऱ्या वाढविण्याची मागणी झालेली नाही. प्रवाशांची संख्या पाहून याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं आहे.
या दरम्यान, लोकलने प्रवास करणाऱ्यांना फोटो असलेला पास दिला जाणार आहे. तो पास असेल तरच त्यांना लोकलचे तिकीट दिले जाईल. यासाठी प्रवाशांनी पोलीस प्रशासनाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक असणार आहे. अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी करून निकषात बसणाऱ्या प्रवाशांना पास दिला जाणार आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!