पत्नीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय; पतीच्या कृत्याने सगळेच हादरले

पिंपरी चिंचवड : संशयाचे भूत मानगुटीवर बसले की भयानक रूप धारण करते. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड मधील चाकण परिसरात घडली आहे. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीला लोखंडी स्टूलने मारहाण करत तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी येथील भवानी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली.

अमोल गजानन राणे (वय 38, रा. आळंदी देवाची, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश मदनलाल गोलेचा (वय 33, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रामेश्वर वामन पवार (वय 35, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमोल राणे याचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी रामेश्वर पवार याला होता. त्या कारणावरून आरोपीने नाणेकरवाडी येथील भवानी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत येऊन अमोल राणे यांना लोखंडी रॉडने मारून ठार मारले. त्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीला लोखंडी स्टूलने डोक्यात, तोंडावर, पाठीवर, हातापायावर मारून गंभीर जखमी केले. आरोपीने त्याच्या पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.