हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या रागातून हॉटेल मालकाने तलवारीने सपासप वार करून एकाला संपवले

पिंपरी चिंचवड : पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील वाकी खुर्द इथं हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या रागातून हॉटेल मालक आणि त्याच्या साथीदाराने दोघांवर प्राणघातक हल्ला केला.  चार चाकी मोटारीने दुचाकीस धडक देऊन एकावर तलवार हल्ला करून ठार केले; तर दुसर्याच्या अंगावर चार चाकी मोटार घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चाकण जवळील वाकी खुर्द ( ता. खेड ) येथे भामा नदीच्या पुलावर सोमवारी (दि.९ ऑगस्ट ) रात्री आकाराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मंगळवारी ( दि.१०) चाकण पोलिसांनी हॉटेल मालकासह दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेमंत संतोष सुतार ( रा. लादवड, ता. खेड , जि. पुणे ) असे तलवार हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरज विठ्ठल वाळूंज ( वय २८, रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड ) असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी वाकी खुर्द येथील हॉटेल सागरचा मालक ऋतिक अतुल वहिले (वय २२  रा.सुंबरेनगर वाकी खुर्द ता.खेड जि.पुणे),  मयुर बाळासाहेब येवले (वय २० रा. सुंबरेनगर वाकी खुर्द ता.खेड जि.पुणे.) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संकेत लांडे, हेमंत सुतार, अनिकेत जावळे व अमोल दिघे हे सोमवारी (दि. ९ ऑगस्ट ) वाकी खुर्द येथील हॉटेल सागर येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मद्यपान केल्यानंतर किरकोळ कारणावरून हेमंत याने हॉटेल सागरचा मॅनेजर धीरज आणि कुक यांना मारहाण केली.

त्यावेळी हॉटेलचे मालक वहिले व मित्रांनी सदरचे भांडण मिटवले. त्यानंतर सर्व जण दुचाकींवरून घरी जाण्यासाठी निघाले. हॉटेल मध्ये भांडण करणाऱ्या हेमंत यास हॉटेल मालक ऋतिक वहिले याने फोन करून हॉटेलवर भांडण केल्याच्या रागातून शिविगाळ व दमबाजी केली. हेमंत सुतार याने आम्ही भामा नदीच्या पुलाजवळ हॉटेल शेतकरी येथे थांबल्याचे हॉटेल मालक ऋतिक वहिले यांस सांगितले.

त्यानंतर फिर्यादी सुरज वाळूंज व हेमंत सुतार पुणे नाशिक महामार्गावरून रॉंगसाईडने भाम फाट्याकडे जात असताना रात्री आकाराचे सुमारास पाठीमागील बाजूने आलेल्या चार चाकी मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरील हेमंत व सुरज दोघेही खाली पडले.  त्यानंतर लाल रंगाच्या ब्रीझा मोटारीने सुरज वाळूंज याच्या पायावरून ब्रीझा मोटार घातली.

मोटार पायावरून गेल्याने सुरज वाळूंज जागेवरच विव्हळत पडला. सदर मोटारीमधून हॉटेल सागरचा मालक ऋतिक वहिले व मयूर येवले उतरले. त्यांच्या हातात तलवार आणि लाकडी दांडकी होती. रस्त्यावर पडलेल्या हेमंत याच्यावर लाकडी दांडकी आणि तलवारीने जबर मारहाण करुन गंभीर जखमी करुन ठार मारले. अधिक तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.