मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक, 5 कोटींच्या फसवणूकीचा आरोप

पुणे :ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने, चांदी आदी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवित, गुंतवणूक करण्यास भाग पाडून १८ गुंतवणूकदारांची ५ कोटी ९ लाख ७२ हजार ९७० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी  मराठे ज्वेलर्सच्या माजी भागीदाराला अटक कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.न्यायालयाने प्रणव मराठे यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रणव मिलिंद मराठे  (वय 26, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. तपासासाठी पोलिस ठाण्यात हजर होण्याबाबत वेळोवेळी नोटीश पाठवूनही हजर न झाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी कौस्तुभ अरविंद मराठे  (रा. कर्वेनगर), मंजिरी कौस्तुभ मराठे , नीना मिलिंद मराठे आणि इतरांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.तसेच आत्महत्या केलेले मराठे ज्वेलर्सचे मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे यांच्यावरही फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. याबाबत शुभांगी विष्णू कुटे (वय 59, रा. शिवतीर्थ नगर, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.

प्रणव मराठे ज्वेलर्सची लक्ष्मी रोड तसेच पौड रोड कोथरूड येथील शाखांमध्ये 14 जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. प्रणव मराठे हा मराठे ज्वेलर्स या भागीदारी संस्थेत 1 जुलै 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत भागीदार होता. तर सहायक सरकारी वकील एम.बी वाडेकर यांनी युक्तीवादादरम्यान सांगितले की, सर्व गुंतवणुकदार ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्या आयुष्यभराची कमाई गुंतवणूक म्हणून दिली आहे. आरोपीने गुंतवणूकदारांची रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे तसेच व्यापारात सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येत आहे.

आरोपींनी प्रणव ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने, चांदी आदी गुंतवणूक करायला लावली तसेच फिर्यादींसह एकुण 18 गुंतवणूकदारांची 5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रूपयांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले आहे. याप्रकरणात 21 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल करण्याता आला आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.